महाराष्ट्र
‘बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु’, पडळकरांचा इशारा
MPSC आयोगामार्फत राज्यातील भरल्या जाणाऱ्या जागांमध्ये बिंदू नामावलीनुसार धनगर समाजाला 3.5 टक्के आरक्षित जागा द्या. बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा दिल्या नाहीत तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय. पीएसआयच्या भरतीत अवघ्या तीनच जागा दिल्याने धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी एमपीएससी आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता पडळकर सरकारवर तुटून पडल्याचं पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रशासनावर वचक नाही. मुख्यमंत्री निकामी आणि प्रशासनही निकामी आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि समाज कल्याण विभागाचे मंत्री झोपा काढत आहेत का? असा खोचक सवालही गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. बिंदू नामावलीनुसारचं धनगर समाजाच्या जागा भरा अशी मागणी पडळकर यांनी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही पडळकर यांनी दिलाय.
‘धनगर समाजातील मुलांवर अन्याय’
एमपीएससी आयोग धनगर आणि वंजारी समाजाला आरक्षणानुसार जागा देत नाही. त्यामुळे धनगर समाजातील मुलांवर अन्याय होत असल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे. 2020च्या एमपीएससी आणि पीएसआय पदांच्या भरतीत धनगर समाजाला अवघ्या तीन जागा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आयोगाने आरक्षणानुसार जागा भराव्यात, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा विद्यार्थ्यांनी केला आहे. एनटीडी आणि एनटीसी जागा आरक्षणानुसार द्या, अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी केली आहे.




