महाराष्ट्र
महाराष्ट्राची जुडो रेसलिंगमधील राष्ट्रीय खेळाडू वैभवी ठुबे हिला पुण्याच्या बांधकाम व्यावसायिकाने केली मारहाण केली!
एका राष्ट्रीय खेळाडूला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण झाल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे. महाराष्ट्राची जुडो रेसलिंगमधील राष्ट्रीय खेळाडू वैभवी ठुबे हिला सुमित टिळेकर या बांधकाम व्यावसायिकाने मारहाण केली.
“ती मुलगी खेळाडू असल्याने तिने तो मार सहनही केला. पण आर्मी भरती असो किंवा तिचे पुढील सामने, हात तुटल्यामुळे तिचे भवितव्य टांगणीला लागले आहे. तुम्ही उर्मट आणि घाणेरड्या वृत्तीच्या माणसांना तातडीने अटक करावी अन्यथा मनसे त्यांना फोडेल” असा इशारा मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी दिला आहे.
वैभवी ठुबे या आपल्या एक्टिवावर होत्या तर सुमित टिळेकर बीएमडब्ल्यू कारमध्ये ! हडपसर भागात टिळेकर यांची कार वैभवी ठुबे यांच्या ॲक्टिवाला घासून गेली, यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली होती. ते प्रकरण तेथेच थंडावलं होतं. परंतु पुढे सिग्नलवर पुन्हा बाजूबाजूला आल्यानंतर टिळेकर यांने वैभवीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर वैभवीने आपली ॲक्टिवा त्यांच्या गाडीसमोर लावली आणि काय बोलायचं, ते बाहेर येऊन बोल, असं म्हटलं. त्यावर टिळेकर हातात रॉड घेऊनच कारबाहेर पडला आणि त्याने सरळ गुंडगिरी करत वैभवीला मारहाण सुरू केली.
आपल्या डोक्यावर पडणारा प्रहार चुकवण्यासाठी वैभवीने आपला हात मध्ये घातला आणि त्यावर घाव बसून तो फ्रॅक्चर झालाय. या घटनेनंतर पोलिसांनी किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे ; परंतु हा जीवे मारण्याचा प्रयत्न होता, असं वैभवी यांचं म्हणणं आहे आणि जोवर टिळेकरविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. हाताला मार लागलेला असल्यामुळे त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील करीअरवर सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
सुमित टिळेकर हा भाजपाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांचा चुलत भाऊ असल्याचं समजतं. त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव आहे, असा आरोप केला जातोय.




