चाळीसगाव तालुक्यात मागेल त्याला टँकर देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे राष्ट्रीय जन मंच पक्षाचे निवेदन …
चाळीसगाव (झूम मराठी) चाळीसगाव तालुक्यात तापमानाचा पारा ४४ अंशावर गेला आहे. रोजच तापमान वाढत आहे. अश्यात टंचाईच्या झळाही तीव्र होत आहे. चाळीसगाव तालुक्यात ३३ गावामध्ये पाणीबाणीची स्थिती उदभवली कारणाने चाळीसगाव तालुक्यात मागेल त्याला टँकर देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे राष्ट्रीय जन मंच पक्षाचे निवेदन
सध्यस्थितीत तालुक्यातील ३३ गावांना ४६ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मे माहिन्यात पाणी टंचाईच्या सावटाखाली येणाऱ्या गावांची संख्या ७० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कमी पावसामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. विहिरींच्या भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई चाळीसगाव तालुक्यात आहे. मागील वर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे, गिरणा धरणात ५६% जलसाठा शिल्लक आहे. तापमानाचा पारा दरदिवशी वाढत आहे. गिरणा धरण परिसरात तापमान ४४ अंशावर गेल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे गिरणा धरणावर अवलंबून असलेली गावे तसेच चाळीसगाव शहर यामध्ये तीव्र पाणीटंचाई भासत आहे. शहरात नगरपालिका हद्दीत ८-१० दिवसांनी पिण्याचे पाणी येत आहे. खेड्यामध्ये तर काही गावांमध्ये १५ दिवसांनी टँकर पोहोचत आहे. त्यात विसापूर तांडा, अंधारी , करजगावं, कृष्णानगर, हातगांव, हिरापूर, तमगव्हाण , रोहिणी, राजदेहेरे, ब्राह्म्णशेवगे, घोडेगाव, हातगांव, पिंप्रीबुद्रुक, खराडी ,डोनदिगर, तळेगाव, न्हावे, ढोमने, पिंपळगाव, माळशेवगे, शिंदी, चतुर्भुज तांडा, शेवरी,बिलाखेड, जुंनपाणी , पिंपळवाड निकुंभ, तळोदे प्र. दे., चिंचगव्हाण, अभोणे तांडा, सुंदरनगर, नाईकनगर तांडा १ , वाघळी या गावांचा समावेश आहे.
राष्ट्रीय जन मंच पक्षाच्या मध्यमातुन जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांना लेखी निवेदन देऊन, समक्ष भेटून त्याचा पाठपुरावा केल्यामुळे तालुक्यातील ३३ गावामध्ये पाणीपुरवठा सुरु आहे. यात अजून ३५ बाधित गावांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करणेबाबत लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा. अन्यथा तालुका भर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय जन मंच पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप दादा लांडगे यांनी दिला आहे.



