आपल खान्देशब्रेकिंग

Jalgoan | जिद्दी भाग्यश्रीला काळाने गाठलं; अपघातात गमावला जीव

जळगाव तालुक्यातील जानवे येथील वडिलांना दूध व्यवसायात मदत करणाऱ्या एका अठरा वर्षीय तरुणीला काल सोमवारी रात्री साडे आठवाजेच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना अमळनेर-धुळे रस्त्यावरील लोंढवे फाट्याच्या जवळ घडली. भाग्यश्री दीपक पाटील असं सदर तरुणीचं नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दीड महिन्यांपूर्वीच मोटारसायकलवरून घसरून दीपक पाटील यांचा अपघात झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मोटारसायकल चालवू नये, असा सल्ला दिला होता. त्यामुळे दीपक पाटील यांची मुलगी भाग्यश्री ही त्यांना दूध व्यवसायासाठी मदत करत होती. नेहमीप्रमाणे भाग्यश्री सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मोटारसायकल (क्रमांक- एम एच १९ ,ई बी ६०२७) वर दुधाचे कॅन घेऊन अमळनेर इथं येत असताना लोंढवे शिवारात अज्ञात वाहनाने कट मारल्याने मोटरसायकल रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात मोटारसायलवरून खाली पडून भाग्यश्रीच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला होता. भूषण पाटील यांनी जानवे गावात माहिती कळवल्यावर गावातील लोकांनी तिला उचलून दवाखान्यात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

  • वडिलांचा आधार गमावला

जानवे गावातील भाग्यश्री पाटील ही तरुणी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील होती. वडिलांचा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होता मात्र शालेय जीवनापासून भाग्यश्री ही धाडसी आणि जिद्दी वृत्तीची होती. पोलीस अधिकारी व्हावं असं तिचं स्वप्न होतं. मात्र कुटुंबासाठी वडील करत असलेले परिश्रम यामुळे शालेय जीवनापासूनच भाग्यश्री आपल्या वडिलांच्या कामात हातभार लावू लागली. पशुपालनापासून ते दूध काढण्यापर्यंत भाग्यश्री वडिलांना हातभार लावू लागली. तर काढलेले दूध गावोगावी पोहोचवण्याचे काम देखील भाग्यश्री करू लागली. हे करत असताना भाग्यश्रीने अभ्यासाकडे थोडेही दुर्लक्ष केले नाही. ती 2021/22 मधील दहावीच्या परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली. दहावीनंतर महाविद्यालयात प्रवेश घेऊन भाग्यश्री नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेतही भाग्यश्रीने उत्तीर्ण होत चांगले यश मिळवले. मात्र गेल्या काही महिन्यापूर्वी भाग्यश्रीचे वडील दीपक पाटील यांचा अपघात झाल्याने त्यांना दुचाकी चालवायला डॉक्टरांनी मनाई केली होती. त्यामुळे भाग्यश्रीचे वडील दीपक पाटील यांच्यासमोर परिवाराच्या उदरनिर्वाहाचे मोठे संकट निर्माण झाले होते.

  • पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्ण

धाडसी वृत्तीच्या भाग्यश्रीने वडिलांच्या अपघातानंतर वडिलांचा संपूर्ण व्यवसाय एक हाती आपल्या ताब्यात घेत वडिलांच्या व्यवसायात अजून भरारी आणली. स्वतः दुचाकीवर 100 किलोमीटरचा प्रवास करत दूध पोचवण्याचं काम भाग्यश्री एकटी करत होती त्यामुळे तिच्या हिम्मतीचे परिसरात कायम कौतुक केले जात होते. बारावीच्या परीक्षेनंतर पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असलेल्या भाग्यश्रीने दुग्ध व्यवसायासोबतच पोलीस भरतीसाठी सरावही सुरू केला होता. मात्र नियतीला काही वेगळच मान्य होतं. 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे