पाडवी नूतन विद्यालयाचे माजी प्राचार्य अण्णासाहेब शिवराम महादू परदेशी शिक्षण क्षेत्रातील दिलदार व्यक्तिमत्व हरपले
धुळे तालुक्यातील कुसुंबा म्हणजे शैक्षणिक,राजकिय क्षेत्रात नावाजलेले गाव पांझरा नदीच्या किनार्यावर असल्याने या गावाच्या अवतीभवती पूर्वी मोठमोठ्या आमराई पहायला मिळायच्या या परीसरात पिकणार्या कौशिंबी आंब्यामुळेच या गावाला “कुसुंबा” हे नाव पडले असे आमचे तत्कालीन गुरूजी आम्हाला सांगत.कुसुंबा आमच्या परीसरातील मतदार संघाचे व आठवडे बाजाराचे गाव. पंचक्रोशीतील गावातील लोक पूर्वी धुळ्याऐवजी कुसुंब्यात बाजारहाट साठी दर बुधवारी पायी येत आम्ही देखिल लहानपणी बुधवारी आठवडे बाजाराची सुटी असल्याने कुसुंब्याच्या बाजारात आईवडीलंसोबत नक्की जायचो.या कुसुंब्याचे अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे धुळे जिल्ह्यात कुसुंब्याला ‘मास्तरांचे गाव’ म्हणून ओळखले जायचे.कुसुंब्यात प्रत्येक घराघरात किमान एक तरी प्राथमिक शिक्षक असायचाच.त्यामुळे शैक्षणिक,राजकिय, आर्थिकदृष्ट्या अतिशय सुखी संपन्न गाव होते व आज देखिल आहे.या गावातच एका सुखीसंपन्न परदेशी परीवारात अण्णासाहेब शिवराम महादू परदेशी यांचा जन्म झाला. दोन भाऊ आणि तिन बहिणी असा हा परीवार अण्णा त्याकाळी एम.ए.बी.एड होऊन त्याचे तत्कालीन मित्र धुळे जिल्ह्याचे नेते आमदार माजी मंत्री आदरणीय दाजीसाहेब रोहीदासजी पाटील यांच्या आग्रहाखातर माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी स्विकारली.अण्णा पाडवी नूतन विद्यालयात शिक्षक म्हणून लागले तेथेच त्यांना पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक व प्राचार्य म्हणून बढती मिळाली व त्याच विद्यालयात प्रदीर्घकाळ नोकरी करून सेवेतून २००३ साली निवृत्त झाले.त्यांच्या सेवापूर्ती समारंभास स्वतः आदरणीय दाजीसाहेब पुर्ण वेळ उपस्थीत होते.सुमारे ३५ वर्षाच्या नोकरीच्या काळात अण्णा एक विद्यार्थी प्रिय शिक्षक व विद्यार्थ्यांवर प्रचंड दरारा असणारे शिक्षक म्हणून सर्वांना परीचित होते.धुळ्याच्या मिलपरीसरात अण्णांचा प्रचंड दरारा होता.परीसरात अण्णांविषयी विद्यार्थी व पालकांत आदरयुक्त भिती होती. म्हणून परीसरात त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा.त्यामुळे झोपडपट्टी एरीयात असूनही त्याकाळात नूतन पाडवी शाळा धुळे शहरात एक नावाजलेली शाळा म्हणून ओळखली जायची.२००३ पर्यंत या शाळेत एक एका वर्गात ७०-८० पटसंख्या होती व प्रत्येक वर्गाच्या ६-६ तुकड्या होत्या असा परदेशी अण्णांचा शैक्षणिक वैभवशाली सुवर्णकाळ होता.ही शाळा साहित्य,सांस्कृतीक, क्रिडा क्षेत्रात अतिशय नावाजलेली होती.म्हणून याशाळेत प्रवेश मिळवण्यासाठी वशिला लावावा लागत असे.कारण त्याकाळी शाळेसाठी प्रचंड मेहनत घेणारी शिक्षकांची टिम होती आणि शिक्षकातील कलागुण हेरणारे अण्णासाहेब परदेशी सारखे मुख्याध्यापक होते.अण्णांचे व्यक्तीमत्व अतिशय प्रभावी होते.दिसायला अतिशय देखणे व प्रभावी वक्तृत्वामुळे समोरच्या व्यक्तींवर,अधिकार्यांवर अण्णांची लगेचच छाप पडायची.आदरणीय दाजीसाहेबांशी अतिशय मित्रत्वाचे संबंध असूनही त्यांनी आपल्या शैक्षणिक कामात कधीच कामचुकारपणा केला नाही.कधीच वशिला दाखवला नाही स्वतः चे मेव्हणे निंबादादा परदेशी त्याकाळी दाजीसाहेबांचे अतिशय निकटवर्ती होते.त्यांचादेखिल त्यांनी कधी गैरफायदा घेतला नाही.अण्णा आयुष्यभर शिक्षक म्हणूनच जगले.माझा स्टॉफ हाच माझा परीवार आहे अशा भावनेने सर्वांशी गोडीगुलामीने अण्णा सर्वांशी मित्राप्रमाणे वागत म्हणून अण्णांच्या काळात स्टॉफमध्ये कधीच वाद झाले नाहीत.अण्णांच्या धर्मपत्नी सौ.गंगाताई या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या मैत्रिण होत्या.प्रतिभाताईंचे त्यांच्याकडे नेहमी येणेजाणे होते तरी त्यांनीदेखील कधी बढेजावपणा मिरवला नाही.त्या स्वतः मुस्लीम बहूल भागात स्वस्त धान्य दुकान व आटा चक्की चालवून सतत हिंदू-मुस्लीम भेद न करता अडल्या नडलेल्यांना जातीभेद न पाळता सतत मदत करायच्या म्हणून मुस्लीम लोक सुध्दा त्यांच्यावर जिव ओवाळायचे जातीय तणावाच्या काळात कोणीही,कधीच त्यांना त्रास दिला नाही असा परीसरात त्यांनी गोडवा निर्माण केला होता.त्यांना सेवानिवृत्त होवून आज १९ वर्ष झालीत पण त्यांच्या प्रकृतीकडे पाहून कोणीच म्हटलं नसतं की या व्यक्तींचे वय ७७ वर्ष असेल.अण्णा आजही दररोज ५-६ किलोमीटर पायी फिरायचे धुळ्यापासून २० किमी वर कुसूंब्याला स्वतः शेती करायचे,सुखीसंपन्न परीवारातले असूनही सर्व आप्तस्वकिय,इष्टमित्रांच्या सुखदुःखात हजरच असायचे.अशा व्यक्तीमत्वाच्या छत्राखाली आमच्यासारख्यांना मार्गदर्शन मिळाले हे आमचे भाग्य समजतो व अण्णासाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.
शब्दांकन-श्री.सुभाष मासुळे,उपशिक्षक पाडवी नूतन विद्यालय,धुळे.




