शेतकऱ्याच्या जन्माला परत कधीच येणार नाही! पंढरपूर येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या!
तरुण शेतकऱ्यांनी सरकारच्या शेती विषयक धोरणाला कंटाळून आत्महत्या केली आहे
पंढरपूर येथे काल धक्कादायक घटना घडली. तरुण शेतकऱ्यांनी सरकारच्या शेती विषयक धोरणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. सूरज जाधव असं या शेतकऱ्याचं नाव असून सूरजने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ पोस्ट करताना म्हटले आहे की, वीज तोडणीचा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून आणि वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणवर वैतागून परत शेतकरी जन्माला येणार नाही असे म्हणून मगरवाडी तालुका पंढरपूर येथील तरुण सूरज जाधव यांनी आत्महत्या केली.
सूरजने भांडवल उभं करुन ३५ ते ४० गाई घेत दुधाचा व्यवसाय सुरु केला. परंतू दुधाचे दर सतत वरखाली होत राहणं, गाईंच्या खाद्याचा खर्च, सरकारची धोरणं याचा ताळमेळ सूरजला लागत नव्हता. यातून आलेल्या नैराश्यामुळेच सूरजने आत्महत्या केल्याची माहिती मगरवाडीतील स्थानिक ग्रामस्थांनी दिली. सूरजच्या आत्महत्येनंतर मगरवाडी ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. सूरजला आत्महत्या का करावी लागली याचा विचार सरकारने करुन यावर पावलं उचलावी अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.



