२०२४ च्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन फोडा; भारत मुक्ती मोर्च्याचे अध्यक्ष वामन मेश्राम यांचे विधान..
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
नागपूर (वृत्तसेवा) आगामी २०२४ च्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन फोडा. त्यासाठी प्रत्येक समाज घटकातील पंधरा- पंधरा लाख कार्यकर्ते तयार करा. ईव्हीएम फोडणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा होईल. मात्र पुढे त्यांना आपण स्वातंत्र्य सेनानीचा दर्जा देऊन नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देऊ, असे विधान भारत मुक्ती मोर्च्याचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले आहे. मेश्राम यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. नागपुरातील इंदोरा मैदानात काल आयोजित ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा भांडाफोड’ सभेत मेश्राम बोलत होते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन फोडा. त्यासाठी भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्च्याच्या सर्व कार्यकर्त्यांना मी आदेश देत आहे की, झटपट तयारीला लागा. बैठका घ्या, लाखो कार्यकर्ते तयार करा. ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकांमध्ये घोटाळे होतात. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला त्यात सुधारणा करण्यासाठी अनेक वेळेला मागणी केली. मात्र निवडणूक आयोग ऐकत नाही. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशीनच्या विरोधात भारत बंद आंदोलन करणार आहोत. असा इशाराही मेश्राम यांनी दिला.
मात्र जर ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सुधारणेबद्दल निवडणूक आयोगाने ऐकले नाही, तर २०२४ च्या निवडणुकांमध्ये सर्रास ईव्हीएम मशीन फोडा, असे वामन मेश्राम कार्यकर्त्यांना म्हणाले.
दरम्यान ईव्हीएम मशीनद्वारे झालेल्या निवडणुकीत घोटाळे करून काँग्रेस आणि भाजपने लोकसभा निवडणूक दोनदा जिंकली. दोनदा निवडणुका जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांनी तडजोड केल्याचा आरोपही मेश्राम यांनी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे वामन मेश्राम यांनी ईव्हीएम मशीनच्या विरोधात सुरू केलेली राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा फेब्रुवारी २०२४ पर्यंत चालणार असून देशातील सर्व राज्यांत ७७४ जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे.



