एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांची धमकी ; ठाकरे सरकारने तडकाफडकी वाढवली सुरक्षा !
शिंदे यांना मिळणाऱ्या धमक्यांचा पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या आढाव्यादरम्यान त्यांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेत
झूम मराठी – संतोष दगडे ठाणे
ठाणे : कुख्यात नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेसह अनेक नक्षलवाद्यांना पोलिसांनी चकमकीत मारल्यानंतर पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना धमक्या मिळत असल्याची माहिती आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांकडून शिंदे यांना धमकी देण्यात आली आहे.
शिंदे यांना मिळणाऱ्या धमक्यांचा पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या आढाव्यादरम्यान त्यांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या बैठकीत शिंदे यांच्या सुरक्षेसंबंधीचे निर्देश देण्यात आले आहेत, असे देसाई म्हणाले.
नक्षलवाद्यांकडून आलेल्या धमक्यांसंदर्भात एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रया दिली. मी धमक्यांना घाबरत नाही. याअगोदरही मला अनेक धमक्या आल्या आहेत. त्याचा परिणाम माझ्यावर कधीच झाला नाही, त्यामुळे मला सुरक्षा द्यायची की नाही, याचा निर्णय गृहविभाग घेईल. नक्षलवाद कमी करायचा असेल, तर विकासकामाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीचा विकास घडवून आणला जात आहे, असेही शिंदे म्हणाले.




