महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध शैक्षणिक कार्यक्रम, व्याख्यानाचे आयोजन करावे – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड
मुंबई : महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यातील शाळांमधून विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर तसेच गांधी विचार हा भारतीय विचार व्हावा असा संदेश देणारे करिअर कौन्सिलर आशुतोष शिर्के यांचे महात्मा गांधी यांचे जीवन आणि विचार या विषयावर सकाळी 11 वाजता यु ट्यूबच्या माध्यमातून व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. https://youtu.be/eKc8s4rZei4 या लिंकवर हे व्याख्यान ऐकता येणार असून विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
शिक्षण ही मानवी जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारी प्रभावी प्रणाली आहे. असे म्हणत ‘नयी तालीम’च्या रूपाने देशाला शिक्षणाची अनोखी देणगी देणाऱ्या महात्मा गांधींयांचा 30 जानेवारी हा स्मृतिदिन यानिमित्त त्यांनी देशाला दिलेल्या मन, मनगट आणि मस्तक यांचा विचार प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचावा आणि शिक्षकांनी तो विद्यार्थ्यांमध्ये रूजवावा यासाठी 30 जानेवारी 2022 या हुतात्मादिनी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
गांधीजींची शिक्षणविषयक स्वतंत्र भूमिका होती. त्यांनी संपूर्ण जीवनात आपल्या आचार आणि विचारांतून दिलेले संदेश एकविसाव्या शतकातही महत्त्वपूर्ण आहेत. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना व नव्या पिढीला महात्मा गांधीजींच्या विचारांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार असल्याचेही असेही प्रा.गायकवाड यांनी म्हटले आहे.



