महाराष्ट्र

कोरोना प्रमाणपत्र टोळी पकडली:500-2000 रुपयांत लस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र; सरकारी डॉक्टर, नर्सचा टोळीत समावेश

औरंगाबाद  :  मागील काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणासाठी सक्तीची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र , आता शहरात बनावट कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र देणारी टोळी सक्रीय झाल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जिन्सी पोलीसांनी 500 ते दोन हजार रुपयांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या तिघांना मंगळवारी रंगेहाथ पकडले. या टोळीने आतापर्यंत 400 पेक्षा जास्त बोगस लस प्रमाणपत्रे दिल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे घाटी रुग्णालयातील डॉ. रझीउद्दीन हा या टोळीचा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे.

दुसरा डोस घेतला नाही तर १५ डिसेंबरपासून ५०० रुपये दंड वसूल करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी दिला. त्यानंतर ५०० ते दोन हजार रुपयांमध्ये कोरोना लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी अधिक वेगाने कार्यरत झाली. जिन्सी पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ तिघांना अटक केली.

 

या टोळीत सरकारीच डॉक्टर व नर्स सहभागी असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉ. शेख रझीऊद्दीन फहीमउद्दीन (२७), डॉ. शेख मोहीउद्दीन शेख फहीमउद्दीन (३६, दोघेही रा. दिलरस कॉलनी), अबु बकर अल हमीद हादी अल हमीद (२३, रा. इलियास मशीदजवळ, रहेमानिया कॉलनी, आझाद चौक) आणि मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद अश्पाक (२१, रा. गल्ली क्र. ३, गणेश कॉलनी) यांना अटक करण्यात आली. सिस्टर आढाव, शहेनाज शेख सरकारी कागदपत्रांवर लस घेतल्याच्या खोट्या नोंदी करून बनावट प्रमाणपत्र तयार करत होत्या. जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांना काही जण बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. केंद्रेंनी उपनिरीक्षक अनंत तांगडे यांना सोबत घेत बनावट ग्राहक तयार केले. त्यांनी टोळीतील काहीजणांशी संपर्क साधला. प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवल्यावर उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शेख गनी, जफर पठाण, संतोष बमनात, सरिता कुंडारे, जगताप, परदेशी यांनी घेराव घालत डॉक्टर भावंडांसह कामगार अबु बकर, मोहम्मद मुदस्सीर यांना व्यवहार करुन प्रमाणपत्र देताना रंगेहाथ पकडले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे