गणेशोत्सव सुरू असल्यानं सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. लोक बाप्पांना घरी आणताना वेगवेगळ्या थीमनुसार आकर्षक सजावट करतात. काहीजण तर विविध रुपातील बाप्पांची मूर्ती घरी आणतात. सध्या मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एका कॉलनीतील गणपती बाप्पांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत असून काही राजकीय पक्षांनी हे फोटो पाहून टीका देखील केली आहे. त्याचं कारण म्हणजे आपागंज शीतला कॉलोनीतील या बाप्पांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश नेसवण्यात आलाय. काँग्रेसने यावर टीका करत हिंदुत्वाचे नकली ठेकेदार कुठे आहेत? असा सवाल केलाय. तसेच भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी प्रभू रामानंतर आता गणपतींचा वापर करण्यास सुरुवात केल्याचा आरोप केला आहे.
हिंदुत्वाचे नकली ठेकदार आता कुठे आहेत?
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केके मिश्रा यांनी हे फोटो ट्विट करून लिहिलंय की, “वडिलांच्या सूचनेवरून सत्ता सोडणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांनी १४ वर्षे वनवासात घालवली. त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून सत्तेत येणारे, स्वतःची सत्ता वाचवणारे आणि देणगीचे पैसे खाणारे लोक आता ग्वाल्हेरमध्ये विघ्नहर्त्या गणपती बाप्पांना संघाचा कार्यकर्ता बनवत आहेत. हे योग्य आहे का, हिंदुत्वाचे नकली ठेकदार आता कुठे आहेत?” असा सवाल त्यांनी केलाय.
आम्हाला गणपती बाप्पाला त्या रुपात पाहायचे होते
दुसरीकडे, या झांकीचे आयोजक बलराम सिंह यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, “एखाद्याला कोणत्या रूपात देव पाहायचे आहे, ते त्याच्या भक्तीवर अवलंबून आहे. श्री गणेशाला संघाचा गणवेश घालण्यामागे आमचा काही विशेष हेतू नाही. आम्हाला गणपती बाप्पाला त्या रुपात पाहायचे होते, म्हणून आम्ही ते केलं. आम्ही प्रत्येक वेळी आमच्या कार्यक्रमात गणपतीची मूर्ती वेगवेगळ्या आसनांमध्ये बसवतो. गणेशाचे वाहन असलेल्या मोशकाला देखील आरएसएसच्या गणवेशात परिधान करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे संघाचे कार्यकर्ते नमस्कार करतात, त्याप्रमाणे या दोन्ही मूर्तींची मुद्रा आहे. तसेच मूर्तीच्या मागे सिंहावर सवार असलेल्या भारत मातेचे मोठे पोस्टरही लावण्यात आले आहे.”
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा