वडिलांच्या निधनाच्या दुःखातून सावरत असतानाच, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी डॉ मनोज पाटील यांची निवड..
पाचोरा, जि. जळगाव शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. मनोज दिलीप पाटील, प्राचार्य, शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च, पाचोरा यांची National Teacher Awards 2026 साठी निवड झाली आहे. त्यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची ही विशेष दखल मानली जात आहे.
डॉ. पाटील यांचे वडील श्री. दिलीप माणिक पाटील यांचे 3 जुलै 2026 रोजी निधन झाले. वडिलांच्या निधनाच्या दुःखातून सावरत असतानाच मिळालेला हा सन्मान त्यांनी आपल्या वडिलांना समर्पित केला आहे. त्यामुळे हा पुरस्कार त्यांच्या आयुष्यातील केवळ एक सन्मान न राहता, वडिलांना वाहिलेली अनोखी श्रद्धांजली ठरली आहे.
डॉ. पाटील यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत शिस्तप्रियता, कर्तव्यनिष्ठा आणि अथक परिश्रम यांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. प्राचार्य म्हणून संस्थेच्या शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
कोरोना महामारीच्या कठीण काळातही संशोधनाच्या माध्यमातून शास्त्रज्ञांना आणि संशोधन क्षेत्राला मदत करण्याचे कार्य त्यांनी केले. फार्मसी क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा उपयोग विविध फार्मसी महाविद्यालयांना शैक्षणिक व प्रशासकीय सल्लागार (Consultant) म्हणूनही होत आहे.
गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करून त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, ही त्यांच्या कार्याची आणखी एक महत्त्वाची बाजू आहे. तसेच विविध विद्यापीठांमध्ये Ph.D. Guide म्हणून कार्य करत ते संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन करीत आहेत.
त्यांच्या शैक्षणिक कार्याची, संशोधनातील योगदानाची, विद्यार्थ्यांसाठी केलेल्या मार्गदर्शनाची आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत Global Elite Media and Tech यांच्या वतीने आयोजित National Teacher Awards 2026 साठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
“वडिलांनी दिलेले संस्कार, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीची शिकवण हीच माझ्या कार्याची प्रेरणा आहे. त्यांच्या स्मृतींना हीच माझी खरी आदरांजली,” अशी भावना डॉ. मनोज दिलीप पाटील यांनी व्यक्त केली.
डॉ. पाटील यांच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल शैक्षणिक, संशोधन आणि फार्मसी क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



