ब्रेकिंगमहाराष्ट्र

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या व्यक्तीला ‘ओमिक्रॉन’ करोनाचा संसर्ग? चाचणीसाठी पाठवण्यात आले नमुने

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी परदेशी प्रवाशांच्या चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण आणि त्यांचा प्रवास इतिहास नोंदवण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. असं असतानाच मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या डोंबिवलीमध्ये दक्षिण आफ्रिकेवरुन आलेल्या एका रहिवाशाला करोनाचा लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडालीय. ‘ओमिक्रॉन’ हा नवा व्हेरिएंट ज्या देशांमध्ये पसरलाय त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेतच असल्याने या प्रवाशाला या नवीन प्रकारच्या घातक करोनाची लागण झालेली नाही ना याची सध्या खातरजमा करुन घेतली जात आहे.

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून गेल्या बुधवारी डोंबिवलीत आलेल्या एका रहिवाशाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.

त्याला पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली. तसेच या व्यक्तीला झालेल्या करोनाचा संसर्ग हा नव्या प्रकारच्या “ओमिक्रॉन’ व्हेरिएंटचा तर नाही ना याची तपासणी करण्यासाठी जिनोम सिवेन्सिंग चाचणीसाठी नमुने पाठवण्यात आल्याचेही पानपाटील यांनी स्पष्ट केलं आहे.डोंबिवलीमधील संबंधित करोना पॉझिटिव्ह व्यक्ती दक्षिण आफ्रिकेवरुन दिल्ली आणि नंतर दिल्लीवरुन मुंबईला आली होती, असंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आङे. त्याचप्रमाणे या व्यक्तीच्या भावाची करोना चाचणी नकारात्मक आली आहे. तर इतर कुटुंबियांची करोना चाचणी अद्याप करण्यात आलेली नाही. आज म्हणजेच २९ नोव्हेंबर २०२१ रोजी या व्यक्तीच्या निकटवर्तीयांची आणि कुटुंबियांची करोना चाचणी केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे