बनावट दिव्यांग ओळखपत्रावर प्रवास… थेट गुन्हा दाखल होणार !

महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसमधून प्रवास करताना दिव्यांगाना विशेष सवलत दिली जाते. मात्र, या सवलतीचा लाभ खऱ्या दिव्यांगांपेक्षा बोगस दिव्यांग जास्तकरून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, बनावट दिव्यांग ओळखपत्रांचा वापर रोखण्यासाठी सखोल पडताळणी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण विभागाने एसटी महामंडळाला दिले आहेत. त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम–२०१६ नुसार राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) दिव्यांग प्रवाशांना मोफत अथवा सवलतीच्या प्रवासाची सुविधा दिली जाते. मात्र, अलीकडच्या काळात बनावट दिव्यांग ओळखपत्रांच्या वापरात वाढ झाल्याने या सवलतीचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले होते. या अनुषंगाने दिव्यांग कल्याण विभागाने एसटी महामंडळाला सखोल पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यानुसार आता एसटीकडून कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग कल्याण विभागाच्या पत्रानंतर एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. यानुसार प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवाशांकडील वैश्विक दिव्यांग ओळखपत्राची (यूडीआयडी कार्ड) काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे
तपासणी मोहिमेतून ओळखपत्राची वैधता, फोटो, तपशील आणि प्रत्यक्ष लाभार्थी यामध्ये सुसंगती आहे की नाही, याची खातरजमा केली जाणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे बनावट ओळखपत्रांच्या आधारे मोफत किंवा सवलतीचा प्रवास करणाऱ्यांना चाप बसणार आहे. तसेच खऱ्या आणि पात्र दिव्यांग प्रवाशांनाच सवलतीचा लाभ मिळावा, हा कारवाईमागील मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दिव्यांग सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने ही पडताळणी प्रक्रिया प्रभावीपणे आणि सातत्याने राबविण्याचे नियोजन एसटी प्रशासनाने केले आहे. गरज भासल्यास संशयित प्रकरणांमध्ये संबंधित विभागाशी समन्वय साधून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या तपासणीमुळे सवलतीच्या नावाखाली होणारा गैरप्रकार थांबेल. खऱ्या दिव्यांग प्रवाशांना अधिक न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



