नंदुरबार : शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिवपूर येथे १५ दिवसांपासून डॉक्टरांनी मंडपात अंथरलेल्या ताडपत्रीवर रुग्णांना झोपवून व झाडांच्या फांद्यांना सलाईन लावून उपचार केले. मंडपातील या दवाखान्यात सुमारे पावणे दोनशे टायफॉईडच्या रुग्णांना बरे करण्यात आले. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी एक हॉल उपलब्ध करून दिला. गरज असणाऱ्या रुग्णांना परिसरातील आरोग्य केंद्रातही उपचाराची सोय करून दिली आहे. यामुळे मंडपातील दवाखाना आता एका हॉलमध्ये सुरू झाला आहे. गावातील डॉक्टरांच्या या सेवेने समाधान व्यक्त होत आहे.
शिवपूर (ता. नंदुरबार) गावाची लोकसंख्या हजारापर्यंत असून, निम्मे गाव साथीच्या आजाराने हैराण झाले. सध्या कोरोनाचा कहर सुरू असल्याने गावकरी दवाखान्यांमध्ये उपचार घेण्यास धजेना. यामुळे येथील डॉ. नीलेश वळवी यांनी रुग्णांना बोलावून एका मोकळ्या जागेत मंडपात दवाखाना सुरू केला. रुग्णांची टायफॉईडची चाचणी करून त्यांच्यावर उपचार सुरू केले.
शिवपूरच्या मंडपात सुरू असणाऱ्या दवाखान्यात गुजरातमधील सायला, मोग्राणी, टाकली, वडली, भिलभवाली, नासेरपूर, मौलीपाडा या निझर तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील नंदुरबारमधील पिंपलोद, भवाली, शिवपूर, लोय, धानोरा गावचे शेकडो रुग्ण आहेत. गावकऱ्यांनी उभारलेल्या मंडपासह प्रत्येकाच्या घरापुढील मंडपात रुग्णांवर उपचार सुरू होते. अनेकजण झाडाला सलाईन अडकवून झाडाखाली बसून उपचार घेत होते.
मंडपातील दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्याने येथे स्वत:ची खाट घेऊन यायची आणि उपचारासाठी दाखल व्हायचे. अनेकांवर येथे उपचार करण्यात आले. गावातील मंडपात का असेना, पण वेळेवर उपचार झाल्याने एकही रुग्ण दगावला नाही. कोणीही लक्ष देत नव्हते. मात्र, डॉ. वळवी यांनी रुग्णांवर योग्य उपचार केल्याने बरे होऊन रुग्ण घरी जात होते. जाताना डॉक्टरांबद्दल समाधान व्यक्त करीत आहे. दरम्यान, याबाबत काही जणांनी हरकती घेतल्याने दोन दिवसांपासून मंडपातील दवाखान्यात उपचार करणे बंद केले होते. आता हा दवाखाना गावातील एका हॉलमध्ये सुरू झाला असून. तेथे रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.
शिवपूर येथे रुग्णांना टायफॉईड, पोटदुखी आदी त्रास जाणवत होता. रुग्णसंख्या मोठी असल्याने उपचारासाठी पुरेशा सुविधा नव्हती. गावातच मंडप थाटून दवाखाना सुरू केला. १५ दिवसांत सुमारे पावणे दोनशे रुग्णांवर उपचार केले असून, ते बरे झाले आहेत.
-डॉ. नीलेश वळवी, सहाय्यक अधिव्याख्याता, वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा