महाराष्ट्र

अखंड प्रेरणास्थान, महाराणी अहिल्यादेवी!!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने अहिल्यादेवी स्मृती लेखन सौ. मनिषा बंडगर-लवटे

अखंड प्रेरणास्थान, महाराणी अहिल्यादेवी!!

चौंढी गावचे पाटील माणकोजी शिंदे यांची अहिल्या ही कन्या. ज्येष्ठ वद्य सप्तमी शके १६४७ म्हणजेच ३१ मे १७२५ या दिवशी सुशिला मातेच्या पोटी झाला. त्यांना महादजी आणि शहाजी नावाची दोन भावांडे होती असा काही ठिकाणी उल्लेख आहे. इंदौरचे सुभेदार मल्हारराव होळकर काही राजनैतिक कामासाठी पुणे दरबारी जात असताना बीड परगन्यातील चौंढी या गावी आले असताना त्यांनी या सुलक्षणी तेजस्वी मुलीला पाहिले आणि तेव्हाच ठरवले की हिच माझी सुन होईल.

मल्हाररावांचे पुत्र खंडेराव नऊ वर्षांचे झाले होते. मल्हाररावांच्या इतमामला साजेशा आशा धुमधडाक्यात १७३३ मध्ये अहिल्यादेवी आणि खंडेराव यांचा विवाह झाला. बीड परगण्यातील ही कन्या आता इंदौरातल्या होळकर वाड्यात वैभवात नांदत होती.कोणीही सरदार पुत्राचा असावा असा अहिल्याबाईंचा खंडेरावांसोबत संसार चालु होता. मल्हाररावांच्या चाणक्ष नजरेने अहिल्याबाईंचा गंभीर चेहरा, सावध नजर, एकाग्र श्रवण या गुणांना टिपले. आपली सून आपल्या लेकापेक्षा सरस आहे हे त्यांनी जाणले त्या मुळे लहान सहान जबाबदाऱ्या ते सुनेवर सोपवू लागले. 

पत्रांची ने-आण करणाऱ्या काशीद जोड्यावर लक्ष ठेवणे. त्यांच्या राहण्या जेवनाची व्यवस्था पाहणे, हूंड्या वटवून पैसा उभा करणे, झाडपाल्याच्या जडीबुटीचीही अहिल्याबाईनी माहिती करुन घेतली होती. मग वाड्यात कुणाचीही तब्येत बिघडली की अहिल्याबाईंचे औषध देणे सुरु झाले.अहिल्याबाई पराक्रमी सासऱ्याचा उजवा हात असलेल्या धर्मशील सुनबाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

१७ मार्च १७५४ या दिवशी कुंभेरीच्या वेढ्यात असताना सुरजमल जाटाने खंडेरावांचा वेध घेतला. खंडेरावाना मृत्यू आला.अहिल्याबाई सती जाण्याच्या तयारीत असताना मल्हाररावांनी विनवणी करुन त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले. अहिल्याबाईंनी सासऱ्यांची पायधूळ मस्तकी लावत त्यांच्या शब्दांना मान देत त्यांची आगतीकता जाणत आपला सती जाण्याचा निर्णय मागे घेतला. 

मल्हाररावांच्या या आज्ञाधारक, कामसू , सतशील , धर्मपरायण सुनेने सासऱ्यांबरोबर राज्यकारभारत पाऊल ठेवले. मल्हाररावांचे एकमेव आशास्थान होते अहिल्याबाई. अहिल्याबाईंच्या कर्तुत्वाबद्द्ल पेशव्यानाही विश्वास वाटत होता. भोवतालच्या जनतेलाही अहिल्याबाईंनी आपलेसे केले. अहिल्याबाईंना दोन मुले मालेराव आणि मुक्ताबाई . मुक्ताबाईंचा विवाह यशवंतराव फणसे यांच्याशी झाला. इकडे मालेरावांचे वागणे जबाबदारीचे नव्हते. त्यांच्या वागण्यात विपरितपणा होता. राज्यकारभारापेक्षा त्यांना प्राण्यात जास्त रस होता.

पानिपताच्या प्रलयकारी युद्धानंतर लढायांवर खर्च होणारा पैसा, त्यातून मिळणारी लूट, राज्याचे उत्पन्न यांचा मेळ घालण्यासाठी मल्हारराव अहिल्याबाईंना सल्ले देत.अहिल्याबाईंनी हा जमाखर्चाचा मेळ यशस्वीपणे घातल्यामुळे मल्हाररावांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंच्या हातात काही कोटी रुपये होते. यातूनच अहिल्याबाई किती दूरदृष्टीने आणि समर्थपणे राज्यकारभार चालवत होत्या हे दिसून येते. राज्यकारभाराबरोबर कौटुंबिक कर्तव्यातही अहिल्याबाई जागरुक होत्या. पुत्राला अबाधितपने सत्तेवर ठेवणे किंवा नातवाला सत्ता मिळवून देणे ही कधीही अहिल्याबाईंच्या राज्यकारभाराची प्रेरणा होऊ शकली नाही हेच त्यांचे समकालीन स्त्रियांपेक्षा वेगळेपण होते.

मल्हाररावांच्या मृत्युनंतर पुणे राज मंडळाने रितसर मल्हाररावांच्या जागी मालेरावांची नियुक्ती केली. होळकरांच्या राज्याचा कारभार अधिकृतपणे मालेरावांवर सोपवला असला तरी अहिल्याबाईंच्याच खांद्यावर भार जाणवत होता. २७ मार्च १७६७ रोजी मालेरावांचा मृत्यू झाला. परंतू एक समर्थ शासनकर्त्या म्हणून ओळखल्या जाऊ लागलेल्या अहिल्याबाईंना व्यक्तिगत भावनेत फार काळ बुडून राहणे शक्य नव्हते. मालेरावही अहिल्याबाईंच्या आयुष्यातील विलक्षण शोकांतिका होती. वयाच्या बविसाव्या वर्षी मालेराव गेले आणि होळकर घराण्यातील तिसऱ्या पुरूषाचा अंत झाला .

मालेरावांच्या म्रुत्युनंतर अहिल्याबाई माहेश्वर किल्ल्यात राहू लागल्या. येथेच प्रमुख कारभारासोबत अहिल्याबाईंचा दरबार भरु लागला.

अहिल्याबाई अगदी लहानपणापासूनच धार्मिक वृत्तीच्या होत्या. इंदौर मध्ये लग्न होऊन आल्यावरही उपाध्यायांनी सांगितलेली व्रतवैकल्ये मनोभावे आचरत असत. गौतमाबाईंबरोबर पोथ्या पुराणांना जात. त्याप्रमाणे जेव्हा त्या माहेश्वरमध्ये राहू लागल्या. तेव्हा ग्रंथ पठण , होमहवन , मंत्रजागर होऊ लागले. अहिल्याबाईंचे मराठे शाहीतील स्थान पारंपारिक गृहिणीसारखे सन्माननीय होते. ती अन्न्पुर्णा होती. राज्यकारभारात काटेकोर हिशेब ठेवुन धनसंचय करणारी, पै-पाहुणे आले गेल्यांचे स्वागत करणारी गृहिणी अनेक जबाबदाऱ्या पार पाडत होती. अडचणीत आलेल्या यात्रेकरुंना वाट खर्चासाठी पैसे दिले जात. सरदार,भट भिक्षुक ,शास्त्री पंडित, शिलेदार,नोकरचाकर जाता-येता माहेश्वरी मुक्कामास येत असत. त्यांचे आगत-स्वागत, जेवण-खाण, देणे-घेणे सर्व यतास्थित होत असे. सर्वसामान्य माणसाला सुख मिळेल,आनंद वाटेल असे कौटुंबिक सोहळे, सण समारंभ जाणिवपूर्वक साजरे करण्याचा अहिल्याबाईंचा स्वभाव होता.

अहिल्याबाईंचे फिरणे इंदौर, माहेश्वर ,उज्जैंनच्या परिसरातच होते पण त्यांचे कार्य हिमालयाच्या केदारनाथ पासुन दक्षिणेच्या रामेश्वर पर्यंत आणि पूर्वेच्या जगन्नाथ पुरी पासुन पश्चिमेच्या द्वारकेपर्यंत चालु होते.त्यांची माणसांची पारख अचुक होती. त्यामूळे त्यांनी प्रचंड माणसे जोडली . या माणसांच्या जोरावर दुरदूरच्या मंदिरांचे जिर्णोद्धार, घाट बांधणे हे त्यांना शक्य झाले. देवळांचे जिर्णोद्धार, धर्मशाला , अन्नछत्रे यांना मदत करुन संस्कृतीची केंद्रे ठायी ठायी उभी केली. सनातन संस्कृतीचे अस्तित्व राखले. त्याचप्रमाणे उत्तम विणकर शोधून वस्त्रोद्योग उभे केले. त्यातूनच आज प्रसिद्ध झालेली माहेश्वरी साडी निर्माण झाली याचे श्रेय अहिल्याबाईंना जाते. आज जगभरात माहेश्वरी साडी पोहचली आहे. अहिल्याबाईंनी बांधलेली पाण्याची कुंड, बारव आजही भारतभर सुस्थितीत आहेत. परंपरेची चौकट सोडून मूलभूत विचार करण्याची ताकद अहिल्याबाईंमध्ये होती. त्यांनी रूढीनुसार दत्तकाचा विचार न करता सूचकपणे स्वतःसाठी सत्तेची सूत्रे माधवराव पेशव्यांकडे मागितली. होळकरांच्या खजिन्यातले धन त्यांनी जनकल्याणाच्या कार्याकडे वळविले.

पानिपताच्या पराभवानंतर जे काही घडत होते त्याचे प्रतिध्वनी अहिल्याबाईंच्या मनात उमटत होते हे दिसून येते. राज्यकारभार करताना काय करायला हवे, काय नको यावर चर्चा करत असताना सुनेच्या मर्यादांचे उल्लंघन कधी त्यांच्याकडून झाले नाही. अशा परिस्थितीतही काटेकोरपणे कारभार संभाळत असताना जातीने त्या कौटुंबिक ,सामजिक रीतिरिवाज ही संभाळत. भविष्यातील त्यांचा दृष्टीकोन आणि कर्तृत्वाची दिशा याच काळात ठरत गेली. अहिल्यादेवी पेशव्यांशीही एकनिष्ठ होत्या. तन -मन -धन अर्पुन रयतेच्या हितासाठी, सुखसमाधनासाठी झटत होत्या.

उत्तम व्यवस्थापन हा अहिल्याबाईंच्या आदर्श व्यक्तिमत्वाचा महत्वाचा पैलू म्हणता येईल.अन्नछत्र चालवण्यासाठी, कथा-कीर्तन, प्रवचन करण्यासाठी ब्राह्मण, तळी विहिरी खोदण्यासाठी माणसांचा शोध त्या आपल्या चाणक्ष बुद्धीने घेत असत.आणि या कामासाठी त्या लोकांना योग्य आर्थिक मोबदला दिला जात असे.कामविसदार , मामलतदार यांच्याकडून नित्याची कामे करून घेणे, योग्य प्रकारे न्याय निवाडा करणे अशी नित्याची कामे त्या काटेकोरपणे करून घेत.

अहिल्यादेवीं इतकी अलोट संपत्ती मराठेशाहीत कोणाही जवळ नव्हती. मुळात मात्तबर असलेल्या परंतू काही काल बिकट परिस्थीत असलेल्या शिंदेशहिलाही अर्थसहाय्य करण्याची ताकात त्यांच्यात होती. बऱ्याच प्रसंगातून दिसून येते, तुकोजी होळकराना सरकारी चाकरिचा थेट अधिकार दिला असला तरी ते जेव्हा जेव्हा पैशाची निकड दाखवत तेव्हा, मोहिमांवर असताना पराक्रम करून पैसा कमवावा असा अहिल्याबाईंचा आदेश होता. यातूनच दिसून येते की , अहिल्याबाई मल्हाररावांच्या शिकवणी नुसार राज्यकारभार कशा डोळसपणे करत होत्या.

अहिल्याबाईंचे सत्तर वर्षांचे सुफल संपूर्ण आयुष्य! 

अहिल्याबाईंचा त्यांच्या डोळ्यासमोरच निर्व्ंश झाला…हे सर्व घडत असताना धैर्याने पुढे गेलेले जीवन स्वकियांकडून सन्मान घेत, त्यांच्याशी सामना ही देत पुढे गेलेले राजकीय जीवन आणि उत्तरोत्तर बहरत गेलेले जनकल्यानकरी असे त्यांचे जीवन. अहिल्याबाईंच्या मागच्या पुढच्या काळात मराठेशाहित अनेक चौकस कर्तुत्ववान स्त्रिया राजकारणात आल्या होत्या. सत्तासंघर्षात उतरल्या होत्या. कधी पराभूत झाल्या, कधी बळी ठरल्या. पण सत्तेच्या केंद्राभोवतीच घुमत राहिल्या होत्या. पण अहिल्याबाई उन्मत्त राजकारणात उतरल्या नाहीत. त्यांच्या गुणांची पारख करणारे सासरे त्यांना लाभले आणि राजकारणात त्यांचा प्रवेश झाला. आजही अठराव्या शतकाच्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर त्या शुक्राच्या चांदणीसारख्या लुकलुकतात.

१३ ऑगस्ट १७९५ मध्ये अहिल्याबाईंचे निधन झाले. राजयोगाचा किंचीतही उपभोग न करता जनसेवा हिच ईश्वर सेवा यांचे पालन करून त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी झाल्या.

अहिल्याबाईंच्या जीवन चरित्रावर प्रभावित होऊन स्कॉटलंडची कवयित्री जोना बेलीने देवी अहिल्येच्या जीवनावर एक दिर्घ काव्य रचले त्या काव्यातील शेवटच्या ओळी सर्व काही सांगून जातात …

‘Kind was her heart, and bright her frame, And Ahalyaa was her honroured name!’

होते हृदय दयाळू , जगी किर्ती करून गेली,स्वनाम धन्य, पुण्यवान अशी देवी अहिल्या झाली!

– सौ. मनिषा बंडगर-लवटे

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे