आता गरमा गरम खाद्यपदार्थ वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून देता येणार नाही, नवे आदेश जारी
वृत्तपत्रामध्ये गरम खाद्यपदार्थ पॅकींग करणे व ग्राहकांना देणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे यापुढे पोहे, बटाटवडा यासारखे गरम खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून दिल्याचे आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे
पुण्यातील हॉटेल मालक आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सर्वांच्या जीभेचे चोचले पुरवाणारा गरमा गरम वडापाव, समोसा, भजी यांसारखे चटपटीत पदार्थ पार्सल घेऊन जाण्याचे नियम आता बदलणार आहेत. पुण्यात गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठी यापुढे वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर करता येणार नाही. वर्तमानपत्र छपाई करताना वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये केमिकल असते, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबत नवीन आदेश काढले आहेत.
पोहे, बटाटे वडे यासारखे अनेक गरम खाद्यपदार्थ सर्रास वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून दिले जातात. तसेच अनेक खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर तेलातून पदार्थ काढल्यानंतर थेट वर्तमानपत्रावर पसरले जातात. टिश्यू पेपर किंवा किचन रोल्सच्या तुलनेत वर्तमानपत्र स्वस्त असल्यामुळे हा पर्याय वापरला जातो. परंतु असे करणे आरोग्यासाठी घातक असते. वर्तमानपत्राच्या कागदामधील शाई पचनक्रियेत बिघाड करण्यास कारणीभूत ठरतात. या केमिकलमुळे अनेक पोटाचे विकारही जडू शकतात, असे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने म्हटले आहे. त्यामुळे आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नवे आदेश काढत खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देण्यास मनाई केली आहे
वृत्तपत्रामध्ये गरम खाद्यपदार्थ पॅकींग करणे व ग्राहकांना देणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे यापुढे पोहे, बटाटवडा यासारखे गरम खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून दिल्याचे आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सर्व अन्न व्यावसायिक, छोटे-मोठे हॉटेल्स, बेकरी व्यावसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीट मार्ट, वडापाव, भजी व भेळ विक्रेते यांना सुचित करण्यात येते की, वृत्तपत्रामध्ये अन्न पदार्थ पॅकींग त्वरीत बंद करावे नाहीतर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमन २०११ अंतर्गत योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल



