ग्लोबल कोविड सेंटरचा महापौर नरेश म्हस्के यांनी घेतला आढावा
मनुष्यबळ, औषधे तातडीने उपलब्ध करुन देण्याबाबत प्रशासनास आदेश
ठाणे, ता. 17 : ठाणे ग्लोबल कोविड सेंटर व नव्याने तयार करण्यात आलेल्या पार्किंग प्लाझा सेंटरमध्ये मोठ्याप्रमाणावर कोरानाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत या पार्श्वभूमीवर आज महापौर नरेश म्हस्के यांनी सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान रुग्णांना जलद व तात्काळ सेवा देण्याबाबतचे आदेश रुगणालय व्यवस्थापनाला दिले. तसेच मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीचे शव तातडीने नेण्याकरिता या ठिकाणी 24 तास शववाहिका ठेवण्याबाबतच्या सूचनाही दिल्या.
कोरोनाबाधित रुग्णांना तत्पर सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्यावतीने ग्लोबल कोविड सेंटर कार्यरत आहे, परंतु मागील काही दिवसांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पार्किंग प्लाझा येथेही नव्याने कोविड सेंटर उभारले आहे, तरी देखील आज नागरिकांना बेड उपलब्ध होत नाहीत. या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के यांनी ग्लोबल कोविड सेंटर येथे प्रत्यक्ष भेट घेवून परिस्थितीचा आढावा घेतला व येथील आवश्यक वाढीव सेवासुविधा, मनुष्यबळ, औषधे तातडीने उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक घेवून तातकाळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. या बैठकीस सभागृह नेते अशोक वैती, शिक्षण समिती सभापती योगेश जानकर, उपायुक्त विश्वनाथ केळकर, मारुती खोडके, प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैजयंती देवगीकर, ग्लोबल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिरुद्ध माळगांवकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता कापडणे, ओमसाई एजन्सीचे प्रमुख उपस्थित होते.

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, जे रुगण दाखल आहेत, त्यांना तात्काळ सेवा उपलब्ध व्हावी यासाठी वाढीव मनुष्यबळ असणे गरजेचे आहे, तसेच रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांचा पुरवठा नियमित व्हावा, वैद्यकीय साधनसामुग्री देखील तात्काळ उपलबध करुन देण्याबाबतही चर्चा करुन निर्णय घेण्यात आला व याबाबत प्रशासनाने तातडीची बाब म्हणून आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देश् महापौर यांनी दिले. तसेच मृत झालेल्या रुगणांचे शव अंत्यसंस्कारासाठी विलंब होणार नाही या दृष्टीने शववाहिकाही 24 तास उपलब्ध करुन देण्याबाबतही सूचित करण्यात आले. तसेच महापालिकेच्या माध्यमातून देखील तज्ज्ञ डॉक्टर्स, आयसीयूसाठी इन्टेंसिव्हीस्ट तातडीने घ्यावेत. ग्लोबल कोविड सेंटर येथे कार्यरत असलेल्या ओमसाई एजन्सीने देखील रुग्णांना तात्काळ उपचार मिळतील याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, कोणत्याही रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होणार नाही याबाबत विशेष दक्षता घ्यावी असे आदेश दिले. तसेच सद्यस्थिती पाहता, सर्वच ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची आवश्यकता असल्याने महापालिका क्षेत्रातील अशा व्यक्तींनी स्वत:हून पुढे येवून या महामारीच्या काळात आपले योगदान द्यावे असे आवाहनही महापौरांनी यावेळी केले.



