चंद्रकांत खैरे यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा जिथे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासणार ; पैसे घेतल्याच्या आरोपावरून वंचित बहुजन आघाडीचा इशारा..
झूम मराठी वृत्तसेवा
औरंगाबाद :- शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपने लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला १ हजार कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेच्या बैठकीनिमित्त जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीवर टीका केली. त्यामुळे खैरे यांनी केलेल्या आरोपामुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. खैरेंच्या या विधानावरून वंचित बहुजन आघाडीत संतापाचे वातावरण पाहायाला मिळत आहे. चंद्रकांत खैरे यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा खैरे दिसतील तिथे त्याचं तोंड काळे करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांनी पत्रकार घेतली. यावेळी ते म्हणाले कि, चंद्रकांत खैरे यांना आम्ही दोन दिवसांचा वेळ दिला आहे. ज्याप्रमाणे खैरेंनी जालन्यात पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीवर आरोप केले आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद शहरात कुठेही पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी बकले यांनी केली. दोन दिवसात त्यांनी माफी मागितली नाही तर, खैरे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा बकले यांनी दिला आहे.
तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. खैरेंच्या या आरोपांवर वंचीत बहुजन आघाडीकडून उत्तर देण्यात येत आहे. खोटे आणि निराधार आरोप करणाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार असून खैरेंनी तयार राहावे, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद यांनी दिला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी विरुद्ध खैरे असा नवा वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.



