पडळकरांचा गनिमी कावा : संचारबंदीतही अहल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण करून दाखवले
सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा थेट शरद पवारांसह, मंत्री जयंत पाटील आणि महाविकास आघाडीला गनिमी काव्याने दिलेला इशारा पूर्ण करून दाखवला. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला. एकीकडे शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यास पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी विरोध केला होता. तसंच मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण करण्यावर पडळकर ठाम होते. मात्र, कडेकोट पोलीस बंदोबस्तात पडळकर यांना होळकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करणं शक्य नसल्याचं पाहायला मिळत होतं. अशा वेळी पडळकर यांनी पुन्हा एकदा आपला गनिमी कावा दाखवला आहे. अहल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करून लोकार्पण केल्याचा दावा पडळकर यांनी केला.
आज ४ वाजता अहल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर मेंढपाळाच्या हस्ते ड्रोनने पुष्पवृष्टी करून लोकार्पण केले आहे. हजारो पोलिसांनी पुतळा परिसराला छावणीचे स्वरूप आलेले असतानाही जयंत पाटलांच्याच सांगलीत पडळकर यांनी त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करून दाखवला.
लोकांनी एखादी गोष्ट मनावर घेतली, लोकांनी कुठलं काम हाती घेतलं की कितीही पोलीस बंदोबस्त लावला तरी ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहात नाही. २१ व्या शतकात टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही ड्रोनद्वारे मेंढपाळांच्या हस्ते अहल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली आहे. आमच्या दृष्टीने अहल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. आम्ही ठरवले होते की, पोलिसांसोबत कुठलाही वाद न करता हा सोहळा पार पाडायचा आणि आम्ही ते करून दाखवलं. आता पोलिसांनी आमच्या चार पोरांना ताब्यात घेतलं आहे.
त्यांना सोडायला जात आहोत. त्यांना सोडल्याशिवाय आमचं काम पूर्ण होणार नाही, अशी प्रतिक्रिया पडळकर यांनी दिली. पापी लोकांच्या हस्ते लोकार्पण होण्यापूर्वी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण पार पडलं याचं आम्हाला समाधान आहे. बहुजन, धनगर समाज हा राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्या विचारांनी पुढील वाटचाल करणारा हा समाज आहे. तो पुण्यवान समाज आहे. या समाजाला बाजूला करत या ठिकाणी काही मंडळींनी उद्घाटनाचा घाट घातला होता. तो आम्ही उधळून लावला आहे, असे पडळकर म्हणाले. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, त्यांना माहिती नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले राज्य आहे. इथं आम्हाला गनिमी कावा कळतो.
मी पोलिसांना सांगितलं होतं की, आमची पाच माणसं जातील आणि लोकार्पण करतील. पण ते नाही म्हणाले. मग २ तारखेला परवानगी कशी? आम्ही त्यांना सांगितलं की, आमचा वाद तुमच्याशी नाही. कुत्र्याला दगड मारला की कुत्रा दगडाला चावतो. पण वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला मारत नाही. वाघ ज्या दिशेनं दगड येतो, त्याच्या नरडीचा घोट घेतो. आणि आमदार गोपीचंद पडळकर बहुजन समाजाचा वाघ आहे.


