पाहणाऱ्यांचेही मन हेलावले! बसस्थानकातच चिमुकला मृत पित्याच्या अंगावर खेळत होता
बीड : बीड जिल्ह्यातील परळीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रात्री उशिरा गावाहून आल्याने एक पिता आपल्या चिमुकल्यासोबत बसस्थानकातच झोपला. पण, दुर्दैवाने पित्याचा झोपेतच मृत्यू झाला. सकाळी चिमुकल्याला जाग आली तेव्हा त्याचा बाप पिता निपचित पडला होता. वडिल जागे होण्याची वाट पाहात तो चिमुकला त्याच्याजवळच बिलगून खेळत होता. या इवल्याशा जीवाला आपला पिता जग सोडून गेल्याचेही कळाले नाही. मन हेलावणाऱ्या या हृदयद्रावक प्रसंगाने अनेकांना गलबलून आले.
शेख शाहेद शेख उस्मान (रा.बरकतनगर, परळी) असे त्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. रविवारी रात्री परळीच्या बसस्थानकात तो उतरला. पण उशिर झाल्याने त्याच ठिकाणी प्लॅटफॉर्मवर अंथरुन टाकून आपल्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन झोपी गेला. सोमवारी सकाळी नागरिकांनी प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या त्या व्यक्तिला आणि मुलाला बघितले. मुलगा त्याच्या अंगाखांद्यावर खेळत होता. परंतु तो व्यक्ती झोपेतच होता. सकाळी हे चित्र पाहून नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले. यावेळी तो व्यक्ती मृत असल्याचे निदर्शनास आले.
यानंतर नागरिकांनी पोलिसांना कळविले. संभाजीनगर पोलिसांनी त्याची ओळख पटविली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. शेख शाहेद यांचा मृत्यू नेमका कशाने झाले याचे कारण अद्याप समोर आलेले नाहीये. पण, ज्या पित्याजवळ मुलगा झोपला होता, त्या पित्याला रात्रीच नियतीने हिरावून घेतले. हे हृदयद्रावक चित्र पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.


