मुंबईनजीक डोंबिवली येथे एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच दुसरी अशाच स्वरूपाची घटना उत्तर प्रदेश इथे उघडकीस आली आहे . 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापासह 28 जणांनी अमानुष पद्धतीने बलात्कार केल्याची घटना असून या नराधमांनी तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केले. विशेष म्हणजे बलात्कार करणाऱ्यांमध्ये काही बड्या राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे.
उपलब्ध वृत्तानुसार , उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील ही घटना असून एक 17 वर्षीय पीडित मुलगी इयत्ता सहावीत शिकत असताना तिच्या वडिलांनी तिला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर बलात्कार केला.घटनेची वाच्यता केल्यास तुला आणि तुझ्या आईला जीवे मारेल अशी धमकी दिल्यामुळे पीडितेनं बापाचा अत्याचार निमूटपणे सहन केला
काही दिवसानंतर आरोपी बाप तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिला गुंगीचे औषध दिले त्यावेळी तिच्यावर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केला आणि त्यानंतर हा प्रकार नेहमीचा झाला असे पीडित मुलीचे म्हणणे आहे .नराधम आरोपींमध्ये काही नातेवाईक आणि राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचं पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. पीडित मुलीच्या आजीने देखील आरोपींना अत्याचारात मदत केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून नराधमांकडून होणारा अत्याचार सहन केल्यानंतर पीडितेनं अखेर ललितपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासनात देखील खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असून आरोपी वडिलांसह ललितपूर सपाचे जिल्हाध्यक्ष, सपाचे शहराध्यक्ष, बसपाचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह तब्बल 28 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा