आपल खान्देशराजकीय
… आणि म्हणे मोठा नेता ; गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंवर हल्लाबोल..
एकनाथ खडसेंनी मला मोठे केले नाही तर मी जनतेचे प्रश्न सोडवून विकासकामांमुळे मोठा झालो, असेही महाजन म्हणाले..
जळगाव :- नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. या अनुषंगाने बोदवड येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास आणि म्हणे मोठा नेता, असे म्हणत महाजन यांनी खडसेंवर हल्लाबोल केला. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
खडसे यांना १५ वर्षे लाल दिव्याची गाडी मिळाली. या कार्यकाळात त्यांना १२ महत्त्वाची खाती मिळाली. मात्र तरीही ते आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकले नाहीत. तुमच्या चुकीच्या वागणुकीमुळे लोकांनी तुम्हाला धडा शिकवला आहे. आता कितीही आवाज चढवला, तुमची धार बोथट झाली आहे. आता तुमचं खरं नाही. दुकानदारी बंद करा, असा टोला महाजन यांनी खडसे यांना लगावला.
काही दिवसांपूर्वी खडसे यांनी महाजन यांना शेरोशायरीच्या माध्यमातून टीका केली होती. यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आता तुमचा दबदबा राहिलेला नाही. तुम्ही सव्वाशेर नाही, आता पावशेर झाले असल्याचा टोलाही महाजनांनी खडसेंना लगावला.
तसेच एकनाथ खडसेंनी मला मोठे केले नाही तर मी जनतेचे प्रश्न सोडवून विकासकामांमुळे मोठा झालो, असेही महाजन म्हणाले.


