भविष्यात काँग्रेसला नक्कीच चांगले दिवस येणार; ‘या’ जिल्हाध्यक्षांचे प्रतिपादन
झूम मराठी वृत्तसेवा
चोपडा :- चोपडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या स्मार्ट हॉलमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी आगामी काळात काँग्रेसला चांगले दिवस येणार असल्याचे प्रतिपादन केले आहे.
काँग्रेस हा तळागाळातील जनसामान्यांचा पक्ष आहे. पक्षवाढीसाठी अडचण नाही. भविष्यात काँग्रेसला चांगले दिवस येतील आणि सर्वांनी पक्ष संघटित केल्यास पक्षवाढीसाठी कोणतीही अडचण येणार नाही, असे प्रतिपादन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी येथे केले.
सध्या सरकार जनतेच्या प्रश्नांबाबत उदासीन आहे. त्यांना फक्त राजकीय अजेंडा राबवण्यातच रस आहे. त्यासाठी ते सातत्याने विविध माध्यमांचा वापर करून संभ्रम निर्माण करण्यात गुंतले आहेत, अशी टीका करत केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना सरकारने अर्थव्यवस्था, सर्वसामान्यांचे प्रश्न, रोजगार, उद्योग-व्यवसायाचा विकास यावर भर दिला होता. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पेट्रोलचे दर प्रतिलिटर ६० रुपये केले होते. त्यावेळी भाजप महागाई वाढल्याची टीका करत होती, असेही ते म्हणाले. मात्र, आज जगभरात कच्च्या तेलाच्या किमती घसरत आहेत. भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. खिशातून पैसे काढून सर्वसामान्यांना गरीब आणि लाचार बनवले जात आहे. भविष्यात काँग्रेसला निश्चितच चांगले दिवस येतील, हे जनतेच्या मनात आहे. कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांनी जनतेशी संपर्क वाढवून हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहचवावा, असे आवाहन प्रदीप पवार यांनी केले आहे.


