आपल खान्देश

वाट चुकला मनोरुग्ण; पोलिसांनी घेतली काळजी, कुटुंबियांचे डोळे पाणावले

झूम मराठी जळगाव(रावेर ) – झारखंड येथील एक मनोरुग्ण तरुण महिनाभरापूर्वी घरातून निघून गेला. भटकत भटकत तो रावेरला पोहचला. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला गाठले आणि चोर असल्याचा संशय व्यक्त केला. काही मिनिटे विचारपूस करताच त्याचे सत्य समजले आणि तो मनोरुग्ण असल्याचे लक्षात आले. पोलीस कर्मचारी निलेश लोहार यांनी दोन दिवस त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेत त्याला आधार दिला आणि शनिवारी कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. १६०० किलोमीटरचा प्रवास केल्यावर अशोकची भेट होताच कुटुंबियांना गहिवरून आले. भेटीचा क्षण पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. युवकाच्या परिवाराने भावना व्यक्त करून पोलीस कर्मचारी निलेश लोहार यांचे आभार मानले.

झारखंड राज्यातील रांची येथील अशोक ठाकूर हा मनोरुग्ण युवक गेल्या एक महिन्यापासून भटकत भटकत शेकडो मैल दूर महाराष्ट्र राज्यात पोहचला. रात्रीच्या वेळी रावेर शहरात फिरत असताना गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला गाठले. अत्यंत भयभीत अवस्थेत असलेल्या तरुणाची पोलीस कर्मचारी निलेश लोहार यांनी विचारपूस केल्यावर त्याला नीटपणे त्याची माहिती देता येत नव्हती. एवढेच नाही तर या मनोरुग्णाच्या खिशात कागदांचे चिटोरे आणि एक बंद मोबाईल आढळून आला. मोबाईल तपासाला असता त्याची बॅटरी संपलेली होती आणि त्यात सिमकार्ड देखील नव्हते.मोबाईलच्या मेसेजवरून लागला शोध

युवकाची मानसिक स्थिती लक्षात घेता पोलीस कर्मचारी निलेश लोहार यांनी त्याचा मोबाईल चार्ज करून तपासाला. मोबाईलचे व्हॉटसअप देखील बंद होते. कॉल लिस्ट सुद्धा कोरी असल्याने मेसेज बॉक्समध्ये असलेल्या एकमेव संदेशाचा आधार घेऊन पो. कॉ. निलेश लोहार यांनी या युवकाची माहिती काढली असता तो झारखंड राज्यातील असल्याने आढळून आले. त्याच्या कुटुंबातील लोकांशी संपर्क साधून पो. कॉ. निलेश लोहार यांनी या मनोरुग्ण तरुण रावेर येथे असल्याची माहिती दिल्याने महिनाभरापासून शोध घेत असलेल्या या मनोरुग्ण युवकाच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

पोलीस निरीक्षकांनी घेतली खबरदारी

व्हिडीओ कॉल करून त्याची ओळख पटविण्यात आली. मनोरुग्ण युवकाला त्याचे नातेवाईक घेण्यास येईपर्यंत त्याला कसे सांभाळणार? हा अत्यंत जोखीम असलेला प्रश्न पो. कॉ. निलेश लोहार यांना पडला होता. त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना या युवकाची माहिती देऊन त्याचे कुटुंबीय त्याला घेण्यासाठी येईपर्यंत त्याचा सांभाळ आपल्या पोलीस ठाण्यात करावा लागेल अशी गळ घातली. अशोक ठाकूर या मनोरुग्ण युवकाची अवस्था पाहून पोलिस निरीक्षक नागरे यांनी तत्काळ होकार देऊन आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना या तरुणाची योग्य देखभाल करण्याच्या सूचना दिल्या. या दरम्यान पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. निलेश लोहार यांनी अशोक ठाकूर या मनोरुग्ण युवकाची काळजी घेत त्याचा सांभाळ केला. यासाठी सहा. फौजदार इस्माईल शेख,पो. कॉ.संदीप घ्यार यांच्यासह मित्र संजय धोबी, निलेश हंसकर यांनी मोलाची मदत मिळाली.

महिनाभरापासून होता बेपत्ता

मनोरुग्ण असलेल्या अशोक ठाकूर यांच्यावर औषधोपचार सुरू होते. अचानक महिनाभरापासून तो कुठेतरी निघुन गेल्याने त्याचे नातेवाईक त्याचा सातत्याने शोध घेत होते. प्रयत्न करूनही अशोक ठाकूर याचा शोध लागत नसल्याने त्याचे कुटुंबीय अत्यंत चिंताग्रस्त झाले होते. मनोरुग्ण असलेले अशोक ठाकूर यांची अवस्था काय झाली असेल याचा विचार करून कुटुंबीयाचा जीव कासावीस झाला होता. अचानक रावेर येथील पोलिस कर्मचारी निलेश लोहार यांनी फोनवर संपर्क करून त्यांच्या कुटुंबीयांना अशोक ठाकूर रावेर येथे असल्याची माहिती दिल्याने त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. अशोक ठाकूर यांचे कुटुंबीय झारखंड राज्यात छोटासा सलून व्यवसाय करतात. मुलाला घ्यायला येण्यासाठी आवश्यक पैशाची जमवाजमव करून ते रावेर येण्यासाठी निघाले.

मुलाला पाहताच तरळले अश्रू

आज शनिवार दिनांक नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी मनोरुग्ण अशोक ठाकूर याचा पुतण्या उमेश ठाकूर व इतर नातेवाईक रावेर पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी अशोक ठाकूर यांच्याकडे पाहताच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. निलेश लोहार या पोलीस कर्मचार्‍याच्या रूपात साक्षात देवानेच माझ्या काकाचे रक्षण केले अशा भावना अशोक ठाकूर यांचा पुतण्या उमेश ठाकूर यांनी व्यक्त केल्या. त्यांनी रावेर पोलीस पोलिसांचे विशेष आभार मानून खाकी वर्दीचा वंदन करून तुमचे उपकार कधीच विसरणार नाही असे सांगून पुन्हा आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनाही गहिवरुन आले. आपल्या हातून सत्कर्म घडल्याचा आनंद पोलिसांच्या चेहऱ्यावर यावेळी होता.

निलेश लोहार यांची पुन्हा माणुसकी

रावेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार यांच्या सामाजिक कार्याबद्दल रावेर शहरात व तालुक्यात आदराने बोलले जाते. कोरोना महामारीच्या काळात सर्व कामधंदे बंद झाल्याने आपापल्या गावात पायपीट करून परत जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना निलेश लोहार या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्या निवास व जेवणाची व्यवस्था करून पोलीस दलाची मान गौरवाने उंचावली होती. अशाच प्रकारे प्रकृती चिंताजनक असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासी समुदायातील लहानशा बाळाला तातडीने उपचार मिळावे यासाठी निलेश लोहार यांनी वेळेवर केलेले सहाय्य व मदतीमुळे या चिमुकल्या बाळाचे प्राण वाचले होते. सातत्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून येणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार यांच्या अनेक संघटनांनी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन गौरव केलेला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे