कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदी मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’
महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली. राज्यातील महिला कारागृहात अनेक महिला कच्चे कैदी आहेत. अनेकदा क्षुल्लक प्रकरणात कोठडीची शिक्षा होते. जामिन मिळवण्याचा मार्ग उपलब्ध असतो. मात्र नक्की काय करायला हवे? कुठल्या प्रकारे अर्ज करावा? याची माहिती नसल्याने, पुरेशी आर्थिक स्थिती नसल्याने तसेच काही तांत्रिक मुद्दयांमुळे अशा महिलांना जामिन मिळत नाही. अशी प्रलंबित प्रकरणे लवकर सोडवून या महिला कैद्यांना मुक्त करणेबाबत महिला बाल विकास विभाग काय भूमिका बजावू शकतो याबाबत मंत्रालयात बैठक घेतली. कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदी मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ही मोहीम राबविण्यात येईल असा निर्णय घेत या दृष्टीने संबंधित विभागांची मदत घेतली जाईल, अशी माहित यशोमती ठाकूर यांनी दिली.
किरकोळ कारणासाठी कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदी, त्यांना न्यायव्यवस्थेत कायदेशीर मदत मिळत नसल्यामुळे किंवा बोर्ड ऐकत नसल्यामुळे कारागृहात रहावे लागते, अशा महिलांना कायदेशीर मदत करून त्यांना कारागृहातून सोडवणुकीसाठी कोर्टामध्ये सहकार्य करणे व त्यांचे समुपदेशन करणे याकरिता महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण संचालक, महाराष्ट्र अभिवक्ता संचालक, जेल प्रिझन यांच्या समवेत महिलांच्या कायदेशीर सहकार्याकरिता राज्य महिला आयोगाचा सहभाग अशा रितीने ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येईल.



