आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
राज्यात डेंग्यूचे थैमान!
राज्यात डेंग्यूचे थैमान:राज्यात डेंग्यूचे आतापर्यंत 6,374 रुग्ण आढळले, 11 मृत्यू; चिकुनगुन्याचीही रुग्णसंख्या पोहोचली 1,537 वर; लहान मुलांमध्येही साथरोगांचा मोठा संसर्ग
राज्यात डेंग्यूचे थैमान:राज्यात डेंग्यूचे आतापर्यंत 6,374 रुग्ण आढळले, 11 मृत्यू; चिकुनगुन्याचीही रुग्णसंख्या पोहोचली 1,537 वर; लहान मुलांमध्येही साथरोगांचा मोठा संसर्ग!
राज्यात कोरोनापासून दिलासा न मिळतो तोच डेंग्यू आणि चिकुनगुन्या या विषाणुजन्य साथींचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आतापर्यंत डेंग्यूचे ६,३७४ रुग्ण अाढळले आहेत. डेंग्यूमुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. चिकुनगुन्याचीही रुग्णसंख्या १,५३७ वर पाेहाेचली आहे. यातील बहुतांश केसेस विदर्भातील आहेत. लहान मुलांंमध्येही या साथीचा मोठा संसर्ग झाल्याचे दिसून येत असले तरी घाबरून न जाण्याचे व योग्य उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे.
गेल्या आठवडाभरात कोरोना पॉझिटिव्हिटी दर घटत असला तरी विषाणुजन्य साथींचे प्रमाण वाढले आहे. यात डेंग्यू, चिकुनगुन्या व आरएसव्ही या साथींचे रुग्ण आढळत आहेत. लहान मुलांंमध्ये ही साथ अधिक गंभीर रूप धारण करत असल्याने मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. मात्र, हे आजार जिवावर बेतणारे नसून याचा कोरोनाशी संबंध नसल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे. कमी न होणारा ताप, पायाच्या स्नायूंना सूज, प्रसंगी उलट्या होणे किंवा पोटदुखी अशी लक्षणे या साथीत दिसून येत आहेत. बालरुग्णालयांत माेठ्या प्रमाणात मुलांना उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे.
ही घ्या काळजी
- डेंग्यू डासांची पैदास होऊ नये म्हणून उघड्यावर पाणी साठवून ठेवू नका.
- हा डास दिवसा फिरणारा असल्याने घरासोबत कार्यालयाच्या ठिकाणीही उघडे व साचलेले पाणी ठेवू नका.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर गोळ्या घेऊ नका. योग्य निदान व त्वरित उपचार करा.



