ध्वजवंदनाच्या दिवशीच ग्रामपंचायत परिसरात अस्वच्छता; दोषींवर कारवाईची मागणी

झूम मराठी वृत्तासाठी — स्थानिक प्रश्नांना आवाज!
पाचोरा तालुक्यातील वडगाव बुद्रुक|| स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच वडगाव बु. ग्रामपंचायत परिसरात अस्वच्छता आढळल्याचा आरोप करत ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याप्रकरणी रहिवासी स्वप्नील कुमावत यांनी पंचायत समिती पाचोरा येथील गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार दाखल करून चौकशीसह दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
१५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय परिसराची आवश्यक साफसफाई करण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कार्यालयासमोर कचरा व घाण, तर मुख्य प्रवेशद्वाराजवळ गाजरगवत आणि इतर गवत वाढलेले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राष्ट्रीय सणाच्या दिवशीच अशा अस्वच्छ वातावरणात ध्वजवंदनाचा कार्यक्रम घेण्यात आल्याने राष्ट्रीय सण आणि राष्ट्रध्वजाच्या सन्मानाला बाधा पोहोचल्याचा आरोप स्वप्नील कुमावत यांनी केला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच जबाबदार लोकप्रतिनिधींवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीची प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते आणि संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
झूम मराठी वृत्तासाठी — स्थानिक प्रश्नांना आवाज!


