मराठवाडामहाराष्ट्र
आम्ही बाळूमामांचे वारस किंवा वंशज नाही : मनोहर महाराज
करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर भोसले हे श्री बाळूमामा यांच्या भक्तांची दिशाभूल करत अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. यानिमित्ताने करमाळा तालुक्यातील मनोहरमामांचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे.
करमाळा (सोलापूर) : उंदरगाव (ता. करमाळा) येथील मनोहर चंद्रकांत भोसले हे श्री बाळूमामा भक्तांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप करत तसेच त्यांचा निषेध करत असल्याचा ठराव कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील आदमापूर ग्रामपंचायतीने केला. यानंतर मनोहर महाराजांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करताना, आम्हीही बाळूमामांचे वारस किंवा वंशज नाही, असे म्हटले आहे.
मनोहर भोसले हे श्री बाळूमामा भक्तांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप करत त्यांचा निषेध करत असल्याचा ठराव आदमापूर ग्रामपंचायतीने केल्यानंतर मनोहर महाराजांविषयी राज्यभर उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. त्यावर मनोहर महाराजांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनोहर भोसले यांनी सांगितले, की बाळूमामांचा अवतार किंवा वारस आजपर्यंत कोणीही झालेले नाही. आम्हीही बाळूमामांचे वारस किंवा वंशज नाही. बाळूमामांचे आडनाव हे आरंभव्य आहे आणि आमचे भोसले आहे, हे सर्वांना माहीत आहे. आम्ही आजपर्यंत कोणत्याही माध्यमांसमोर वारस असल्याचे सांगितलेले नाही. नजरचुकीने कोठे असं वक्तव्य आले असेल तर दुरुस्त करून घेण्याची विनंती त्यांनी केली.
करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर चंद्रकांत भोसले हे श्री बाळूमामा भक्तांची दिशाभूल करत अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. उंदरगाव येथे राज्यातून अनेकजण येथे दर्शनासाठी येतात. सध्या हे प्रकरण वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहे. आदमपूर ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी भोसले यांच्याविषयी तक्रारी आलेल्या आहेत. याशिवाय बाळूमामांचे नाव सांगून आपले आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत. श्री बाळूमामांची शक्ती, श्रद्धा, भजन, कीर्तन इतकेच हे क्रमप्राप्त आहे; मात्र अशाप्रकारे भक्तांची लूट करणे हे श्री बाळूमामांच्या तत्त्वात बसत नाही. त्यांनी आपल्या संपूर्ण अवतार काळात कोणाकडूनही एक दाम घेतला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने भोसले यांचा धिक्कार व निषेध केला आहे. याबाबतचा ग्रामपंचायतीने ठरावही मंजूर केला आहे. याला प्रकाश खापरे हे सूचक आहेत तर सुमन गुरव यांनी अनुमोदन दिले आहे. यानिमित्ताने करमाळा तालुक्यातील मनोहरमामांचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे.





