कर्जत तालुक्यातील कडाव माणकिवली रस्त्यावरील मोरी धोकादायक प्रशासनाचे अक्षम्य!! दुर्लक्ष
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कडाव माणकिवली रस्त्यावरील मोरी धोकादायक, भयंकर अपघात होऊन दुर्घटना होण्याची शक्यता, सुमारे ५० वर्षांपासून रस्त्याचीही महाबिकट दुरावस्था, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष!!
प्रभाकर गंगावणे
कडाव: कडाव ग्रामपंचायत हद्दीतील माणकिवली हे जवळपास तीनशे लोकवस्तीचे गाव असुन गाव विकासापासुन कोसो मैल दूर असल्याचे चित्र दिसत आहे. गावात ये जा करण्यासाठी एकमेव रस्ता असुन रस्त्यावरून पायी चालणाऱ्या ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते तर दुचाकी, रिक्षा व चार चाकी वाहनांतुन प्रवास करणाऱ्यांना उंटावर बसुन प्रवास करत असल्याचे जाणवते. इतकी महाभयंकर दुरावस्था कडाव माणकिवली ह्या रस्त्याची झालेली आहे. ह्या भीषण रस्त्यावरून जाण्यायेण्याचा मनस्ताप वयोवृद्ध तसेच गरोदर महिलांना सर्वाधिक सोसावा लागत आहे. त्यातच गावाच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेली सिमेंट काँक्रिटची मोरी संपुर्ण दुभंगली असुन तीची मरणावस्था झाली आहे. मोरीला भले मोठे भगदाड पडले असुन मोरीच्या खालील सर्व दगडी चिरा उघडुन पडल्या आहेत तसेच आतील लोखंडाचे सिमेंट काँक्रिटचे आवरण निघाले असुन लोखंड गंजुन त्यांचे लहान लहान तुकडे होत आहेत. त्यामुळे एखादे वजनदार वाहन मोरी वरून गेल्यास भयंकर दुर्घटना होऊन जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माणकिवली गावातील ग्रामस्थांना केवळ हाच एक मात्र रस्ता असुन गावातील शालेय विद्यार्थी, बाजारहाट करण्यासाठी व नोकरी व्यवसायानिमित्त गावाबाहेर जाणा-या सर्व महिला व ग्रामस्थांना दुसरा पर्याय नाही. तसेच आसपासच्या परिसरातील मृत व्यक्तींना कडाव माणकिवली गावाजवळील असलेल्या एकमेव स्मशानभुमीत अंत्यविधी करण्यासाठी ह्याच रस्त्यावरून न्याव लागतं असतं. तरी, संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर कडाव माणकिवली रस्त्यावरील धोकादायक मोरी नव्याने दुरुस्त करून माणकिवली गावाला जोडणा-या रस्त्याचेही खडीकरण करुन डांबरीकरण करावे अशी मागणी जोर धरत आहे



