शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा घवघवीत निकाल; मयुरी महाले चार जिल्ह्यांत प्रथम..
डी.फार्म. निकालात विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पुन्हा ठसा

पाचोरा (प्रतिनिधी) गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च, पाचोरा येथील डी.फार्म. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षेच्या निकालात उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
डी.फार्म. प्रथम वर्षाच्या परीक्षेत कु. मयुरी महाले हिने 85 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे धुळे, जळगाव, नंदुरबार आणि संभाजीनगर या चार जिल्ह्यांमधून प्रथम येण्याचा बहुमान तिने मिळविला आहे. तसेच कु. माधुरी परदेशी हिने 82.40 टक्के गुणांसह द्वितीय तर कु. जागृती पाटील हिने 81.30 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवून संस्थेचे नाव उज्ज्वल केले.
डी.फार्म. द्वितीय वर्षाच्या निकालातही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. कु. गायत्री पवार हिने 81 टक्के गुणांसह प्रथम, कु. हर्षदा पाटील हिने 80.55 टक्के गुणांसह द्वितीय तर कु. प्रतिभा तेली हिने 80.36 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, युवा नेते अमोलभाऊ शिंदे, सचिव ॲड. जे. डी. काटकर, संयुक्त सचिव प्रा. डॉ. शिवाजी शिंदे तसेच उपाध्यक्ष नीरज मुनोत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यश संपादन करता येते. विद्यार्थ्यांनी या यशावर समाधान न मानता उच्च शिक्षण व करिअरमध्येही उत्कृष्ट कामगिरी करून संस्थेचे आणि पालकांचे नाव उज्ज्वल करावे.”या यशाबद्दल संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्चच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.


