धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय..
झूम मराठी वृत्तसेवा
राज्यात मागील काही दिवसापासून लाऊडस्पीकरवरून राजकारण चांगलेच तापलेले दिसले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे नंतर मशिदींतील लाऊडस्पीकर हटविण्याचा अल्टिमेटम दिला होता. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि डीजीपी यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने आतापासून विनापरवाना लाऊडस्पीकर लावणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे निवेदन दिले आहे.
महाराष्ट्राच्या गृह विभागाचे निवेदन
३ मे नंतर मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याच्या राज ठाकरेंच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावायचे असल्यास परवानगी घ्यावी लागेल, असे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसे न केल्यास प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल.
गृहमंत्र्यांची भेट घेणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील लवकरच यासंदर्भात महाराष्ट्राच्या डीजीपींसोबत बैठक घेणार आहेत. विनापरवाना लाऊडस्पीकर वापरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. या बैठकीनंतर विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील.


