आमदार किशोर आप्पा पाटील यांना शिवसेनेची मोठी जबाबदारी सोपावली..

पाचोरा टुडे | भाजपला थेट आव्हान देऊन सर्वात आधी स्वबळाचा नारा देणारे पाचोरा भडगाव विधानसभा आमदार किशोरआप्पा पाटील यांना शिवसेनेने आता मोठी जबाबदारी सोपवली असून त्यांना जळगाव जिल्ह्यातील नगर परिषदांसह नगर पंचायतीची सूत्र दिली आहेत.
राज्यात भाजपने बऱ्याच ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढण्याची आणि सोयीने युती करण्याची भूमिका घेतल्याने शिंदे गटात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे, महायुतीतील या तीव्र मतभेदांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीच्या तिन्ही मित्र पक्षांची भूमिका काय असेल आणि त्यांच्या संबंधांवर याचा कसा परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आमदार किशोर पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली असून अश्यात जळगाव जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण यांना शह देण्यासाठी शिवसेनेनेही आमदार किशोर पाटील यांना मोठी जबाबदारी आता सोपवली आहे. निवडणूक प्रभारींची नियुक्ती करताना शिंदे गटाने आमदार किशोर पाटील यांच्याकडे पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर नगर परिषदांसह शेंदुर्णी नगर पंचायतीची सूत्र दिली आहेत.
जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वरणगाव, भुसावळ, धरणगाव आणि नशिराबाद नगर परिषद, आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे चोपडा, फैजपूर, यावल नगर परिषद, आमदार अमोल पाटील यांच्याकडे एरंडोल, पारोळा नगर परिषद, आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे रावेर, सावदा नगर परिषद आणि मुक्ताईनगर नगर पंचायत आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे अमळनेर नगर परिषदेचे निवडणूक प्रभारीपद सोपवले आहे.



