राज्यात लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा..!
राज्यातील इतक्या लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली

लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर १ लाख ६० हजार ५५९ महिला-पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता २ हजार ६५२ महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे उघडकीस आले आहे.
माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिला. सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदविलेली होती. त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात २६५२ महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा गेला असे निदर्शनास आले. त्यांनी ऑगस्ट २०२४ पासून एप्रिलपर्यंत म्हणजे ९ महिन्यांत प्रत्येकी १३ हजार ५०० रुपये घेतले. याचा अर्थ ३ कोटी ५८ लाखांची कमाई त्यांनी केली.
सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आले होते. तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचलले. त्यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शासन करणार वसुली
आता ज्या २,६५२ महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणी बनून पैसा उचलला त्यांच्याकडून आता या रकमेची (३ कोटी ५९ लाख रु.) वसुली करण्यात येणार आहेत, प्रत्येक विभागाला त्या बाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



