नांदेडच्या लेकीचा चांद्रयान 3 मोहिमेत सहभाग. तनुजा पत्की यांच्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव..!
लेकीनेही मोलाची कामगिरी बजावत महाराष्ट्राची मान उंचावली
चाद्रयान ३ मोहिमेत सहभागी झालेल्या तनुजा पत्की ह्या मूळ नांदेडच्या असून सायन्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कैलासवासी कालिदास देशपांडे यांच्या त्या कन्या आहेत. तनुजा पत्की यांचे बालपण नांदेड शहरातील विद्यानगर येथे गेले. त्यांचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण पीपल्स हायस्कुलमध्ये झाले त्यानंतर त्यांनी अकरावी, बारावी हे सायन्स महाविद्यालयात पूर्ण केले. शिवाय श्री गुरुगोबिंदसिंघ जी इंजिनियरिंग कॉलेज मध्ये बी टेक आणि एम.टेक ची पदवी प्राप्त केली. लहानपणापासून त्या अभ्यासात हुशार होत्या. त्यांचे वडील कै. कालिदास देशपांडे हे वनस्पती शास्त्र विषयाचे प्राध्यापक, शास्त्रज्ञ होते. त्यांच्या आई डॉ उषा देशपांडे ह्या देखील सायन्स महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. या दोघांनी अनेक पिढ्या घडवल्या. घरातूच तनुजा यांना संशोधनाचे धडे मिळाले.
तनुजा पत्की यांचे शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न होते. जिद्दीच्या जोरावर आणि आई वडिलांच्या मार्गदर्शनाने त्या शास्त्रज्ञ देखील झाल्या. तनुजा यांचे बंधू राजस देशपांडे हे पुणे येथे न्युरोलोजिस्ट आहेत. तनुजा सद्या त्या बंगळूरु येथे इस्त्रो मध्ये शास्त्रज्ञ कार्यरत आहेत.
चांद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेत नांदेडची कन्या तनुजा यांनी देखील योगदान देऊन नांदेडचे व महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे.!



