धुळ्यात अवैध गर्भपात केंद्रावर छापा; महिला डॉक्टर ताब्यात, महापालिकेच्या पथकानं केली कारवाई…!
या धाडीमध्ये पथकाला गर्भपात करताना डॉक्टरसह नर्सेस आढळून आल्या. विशेष म्हणजे या ठिकाणी गर्भपात करणारी संबंधित महिला ही फक्त नववी पास असल्याची धक्कादायक माहिती
धुळे | प्रतिनिधी
गर्भलिंग निदान चाचणी आणि गर्भपात करणं कायदेशीर गुन्हा असताना देखील सर्रासपणे अनधिकृतपणे गर्भलिंग निदान चाचणी करून गर्भपात केला जातोय. असाच प्रकार धुळ्यात घडलाय. शहरातील साक्री रोडवरील सुमन रुग्णालयात (Suman Hospital) सर्रासपणे अवैधरित्या गर्भपात (Unauthorized Abortion) सुरु असल्याचं उघडकीस आलंय. रुग्णालयातील या अवैध कारभाराची माहिती मिळाल्यानंतर धुळे महापालिकेच्या पथकानं कारवाई केली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडं दोन दिवसांपूर्वी बेकायदेशीररित्या गर्भपात करण्यासंदर्भाची तक्रार दाखल करण्यात आली होती.
,सुमन रुग्णालयात सर्रासपणे गर्भपात सुरू असल्याची तक्रार ‘आमची मुलगी’ या वेबसाईटवर प्राप्त झाली होती. त्यानंतर धुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या संबंधित पथकानं 31 मार्च रोजी सुमन हॉस्पिटल या ठिकाणी धाड टाकली. या धाडीमध्ये पथकाला गर्भपात करताना डॉक्टरसह नर्सेस आढळून आल्या. विशेष म्हणजे या ठिकाणी गर्भपात करणारी संबंधित महिला ही फक्त नववी पास असल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे. या ठिकाणी एका महिलेचा गर्भपात देखील करण्यात आला असून मुलीचं अर्भक देखील पथकाला आढळून आल्याची माहिती, वैद्यकीय आरोग्य अधिकारी संपदा कुलकर्णी यांनी दिली.
सुरत येथे गर्भलिंग निदान करून आल्यानंतर या ठिकाणी गर्भपात होत असल्याची माहिती समोर आली आहे. सुमन रुग्णालयावर कठोर कारवाई करण्यात येणार असून याप्रकरणी डॉ. सोनल वानखेडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासोबत एका नर्सला देखील ताब्यात घेतलं असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी संपदा कुलकर्णी यांनी दिली.



