काँग्रेसचे मिशन २०२४ : प्रशांत किशोर आणि सोनिया गांधींची हायप्रोफाईल बैठक संपन्न
झूम मराठी
नवी दिल्ली :- पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (१६ एप्रिल) दिल्लीत अचानक उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत पक्षाचे १० बडे नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीला निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना बोलवण्यात आले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यासोबतच अंबिका सोनी, दिग्विजय सिंग, अजय माकन या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक दुपारी ३ वाजता पार पडली. ज्यात प्रशांत किशोर यांना येत्या गुजरात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेस नेत्यांसमोर सविस्तर सादरीकरण केले आहे. यासोबतच २०२४च्या तयारीबाबतही रोडमॅप सांगितला. या दरम्यान सामूहिक चर्चा तसेच वैयक्तिक चर्चा झाली. याबाबत बोलताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, आज सोनिया गांधी यांनी तातडीची बैठक बोलावली. मी बंगलोरला होतो. याबाबत मला माहिती देण्यात आली. तसेच बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले होते.
या बैठकीत प्रशांत किशोर यांच्याबाबत काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशांत किशोर यांचा निवडणूक तज्ज्ञ किंवा रणनीतीकार म्हणून पक्षात घेण्यास विरोध आहे. मात्र त्यांनी आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि त्यानंतर कार्यकर्त्यासारखे पक्षाचे काम करावे, अशी काँग्रेसची इच्छा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.




