महाराष्ट्र

सौंदर्यांच्या व्याख्येचं करायचं तरी काय?

 

झूम मराठी न्यूज डिजिटल मीडिया 

प्रज्वली नाईक

साधारण नोव्हेंबर महिना असावा.त्याला लग्नासाठी मुलगी बघ असं घरचे खूप सांगत होते.आतापर्यंत त्याने लग्नासाठी १५-१६ मुली तरी बघितल्या असतील.दर रविवारी सुट्टी असल्यावर नवीन‌ शर्ट-पॅट घालायचं,गाडी काढायची आणि तो घरच्यांसोबत मुली बघायला जायचा.दरवेळचा मेन्यू कांदापोहे नाहीतर चहा-बिस्किट….असे दिवसामागून दिवस जात होते.प्रत्येक मुलगी त्याला सुंदरचं वाटायची पण घरचे काही ना काही कमीपणा दाखवायचे.कधी तो नावं ठेवायचा तर कधी मुली नकार द्यायच्या.त्याला आता या सगळ्याचा कंटाळा आला होता.त्याने एकदिवस घरच्यांना सांगितलं,”मला सुंदरचं मुलगी हवी आहे.चेहरा गोरा,टपोरे डोळे,लांबसडक केस,बारीक अगदी नाजूक…” या सगळ्या त्यांच्या अपेक्षा! तो मात्र स्वतः जाडजूड होता,एका खासगी कंपनीत कामाला होता.पण बायकोचे शिक्षण नसले तरी चालेल पण दिसायला सुंदर,नाजूक आणि चारचौघात उठून दिसणारी हवी होती ही त्याची ठाम अपेक्षा होती.त्याच्या घरच्यांना तर सर्व घरगुती काम येत असलेली,साडी नेसणारी आणि सुंदर मुलगी सून म्हणून हवी होती.कित्येकदा त्यामुळे त्याला नकार देखील आले होते.त्याने खूप जणींना नकार देखील दिले होते.एकदिवस त्याला ऑनलाईन सोशल‌ मिडीयावर एक मुलगी भेटली.तिचा प्रोफाइल फोटोला अभिनेत्रीचा फोटो होता.कधी ती त्याला मेसेज करायची….कधी तो तिला मेसेज करायचा.दोघांनी एकमेकांचे फोटो बघितले नव्हते की ते एकमेकांना भेटले नव्हते….हे सारं काही ऑनलाईचं.ते खूप गप्पा मारायचे अगदी मनमोकळेपणाने…. एकमेकांना मग एकमेकांची ओढ वाटू लागली.खरंतर ते एकमेकांच्या (बोलण्याच्या) प्रेमात होते.एकदिवस त्याने तिला मेसेज केला की,तुला नवरा कसा हवा आहे?ती चटकन म्हणाली,गोरा, बॉंडी असलेला…अगदी हॅण्डसम.मला खूप खरेदी करून देणारा आणि फिरायला घेऊन जाणारा.तसं असेल तरचं मी लग्नाला तयार होईन.तो हे ऐकून लगेच बेडवरून उठला आणि त्याने आरशाकडे बघितलं अगदी निरखून तर त्याला जाणवलं.आपणं तर असे नाही आहोत पण अपेक्षा मात्र समोरच्याकडून स्वप्नासारख्या करतोय.मग त्याने व्यायाम करायला सुरुवात केली पण खाणं मात्र सोडलं नाही.काही दिवसांनी त्याने तिला परत विचारलं लग्न करशील का? मी जाडा आहे पण खरा आहे गं.तिने सरळ नकार दिला.मग बोलणं,ऑनलाईन भेटणं बंद झालं.तो मग हळूहळू तणावात जगत होता.खरं सौंदर्य काय असतं?त्याला जाणवतं होतं.कित्येकदा त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलाही…यात काही काळ गेला पण त्याचं लग्न काही ठरलं नाही.आता तो फक्त स्वतःच्या सौंदर्याची अपेक्षा करत निराशाजनक जगत राहिला.

         असाच अजून एक प्रसंग.काही दिवसांपूर्वी सौंदर्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियात एक चळवळ,मोहीम उभी झाली होती.त्या भागात बाईनं सुंदरच दिसलं पाहिजे,असा दक्षिण कोरियातला अलिखित नियम! त्यासाठी बरेच तास बायका मेकअप करतात. तेव्हा ‘एस्केप द कॉर्सेट’ (‘Escape the Corset’) मोहिमेत डिस्ट्रॉय मेकअप चळवळी अंतर्गत अनेक मुली आपलं मेकअप किट नष्ट करत होत्या. दक्षिण कोरियातील यू-ट्यूब स्टार लीना बी हिने या ‘नो मेक-अप’ मोहिमेला सुरुवात केली. चेहऱ्यावरील मेकअप उतरविण्याचे ट्युटोरिअल्स लीनाने यू-ट्युब आणि समाजमाध्यमांवर व्हिडिओ टाकले. ही गोष्ट सहजासहजी स्विकारली जाणार नाही, याची तिला कल्पना होती. मात्र थेट जीवे मारण्याच्या धमक्या मिळणे हे तिच्यासाठी धक्कादायक होतं. पण २१ वर्षीय लीनाने पूर्ण विचारांती निर्णय घेतला होता.एरवी मेकअप कसा करायचा?याचे धडे देणाऱ्यांना ‘मेकअप नको’ असे प्रमोट करणारा व्हिडिओ अपलोड करणं कितपत पचनी पडेल,याची लीनाला चिंता होती. मात्र कोरियन महिलांच्या स्वतःला सौंदर्यप्रसाधनांच्या थराखाली दडवायच्या सवयीविरोधात ठामपणे भूमिका घेण्याची वेळ आली आहे.त्यामुळे हे उचलेलं क्रांतीचं पाऊल होतं.मग तिने धाडसाने आपल्या खोटया पापण्या काढतानाचा,गडद लाल रंगाची लिपस्टिक पुसतानाचा व्हिडिओ अपलोड केला.त्यानंतर काही वेळातच लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. काहींनी तिला पाठिंबा दिला पण बहुतांश जणांनी तिच्यावर टीका दिली. काहींनी तर ‘आम्ही तुला शोधून जीवे मारू’ अशी धमकीही दिली.”अशा धमक्या मिळाल्यानंतर घराबाहेर पडण्याचीही भीती वाटत होती,” असं लीनाचं म्हणणं होतं.दक्षिण कोरियातील अनेक तरुण मुली लीना बीच्या पावलावर पाऊल टाकत होत्या आणि आहेत.पण खरंच महिलांच्या मेकअपच्या सौंदर्यावर खरं सौंदर्य ठरतं का???हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

          खरंतर हे प्रसंग विचार करायला आणि विचार मांडायला भाग पाडतात.कित्येकजण आपली सौंदर्याची व्याख्या तयार करतात तर कित्येकजण अपेक्षारूपी हे सारंकाही लादतात.खूप वर्षांपूर्वी लोकांना जाड्या,काळ्या आणि जाड ओठांच्या स्त्रिया सुंदर वाटत असतं.त्यानंतर समाज सुंदरतेच्या व्याख्येला शरीराच्या आकारात मग रंगात मग फक्त so called झिरो आणि सेक्सी फिगरमध्ये मोजू लागला.मोजताना प्रतिकांचे मापन देखील केले गेले.जसा साहित्यात, सिनेसृष्टीत,नाटकात, माध्यमात,समाजमाध्यमात आणि एकूणच माणसात काळानुरूप बदल होत गेला.तशी सुंदरतेची,सौंदर्याची व्याख्या काळानुरूप,माणसानुरूप बदलत गेली.मग कॉस्मेटिक आणि जाहिरातीने डोकं वर काढून सौंदर्यांच्या बुरसट संकल्पनेने लोकांच्या मनात सहज घर केलं.खरंतर अमेरिकेतील वर्णभेदाविरोधातील संघर्षाचे पडसाद जगभरात उमटू लागले आहेत.भारतात वर्णभेद पाश्चिमात्य देशांइतका प्रबळ नसला तरी, गोरा रंग म्हणजे सुंदरता हे समीकरण जनमानसात रुजले आहे.काहींना so called figure असणारा स्त्री-पुरुष सुंदर वाटू लागला तर काहींना छाती जास्त असणारे सुंदर वाटू लागले.तर काहींना स्वभावात,वर्तनात,लेखणीत,विचारात सुंदरता दिसू लागली.मग माणसाचा सौंदर्य आणि सुंदरता शोधण्याचा प्रवास सुरू झाला.जाडा माणूस व्यायाम करू लागला,गोरं दिसावं म्हणून उत्पादक,पार्लरचा आधार घेऊ लागला.केस नसतील तर कृत्रिम केस वापरू लागला,केस पांढरे झाल्यावर काळे करू लागला.जाड व्हावं म्हणून प्रोटीन,तत्सम खाद्य आवडीचे खाऊ लागला.मेकअप गरज बनली आणि जीम आधार बनू लागला.समाजमाध्यमांवर फोटो अपलोड करताना विशेषण आणि विशिष्ट शब्द सुंदरतेसाठी वापरू लागला.असं सारं काही भौतिक गरजांमध्ये माणूस वाहवत गेलाय आणि जाईल.पण हे थांबणं आणि थांबवणं आवश्यक आहे.या सगळ्यात माणूस स्वतःचे अस्तित्व स्विकारण्याचं राहून जाईल.प्रत्येक माणसात अनोखी सुंदरता असते ती शोधता आणि जपता आली पाहिजे.आपण जसे आहोत तसे स्वतःला स्विकारता आले पाहिजे.हा बदल जेव्हा होईल तेव्हा ‘सौंदर्य आणि सुंदरता’ यांचा अर्थ माणसाला अवगत जाईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे