ब्रेकिंग
अनिल परब यांच्या घरावर जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्याचा प्रयत्न ; पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात
मुंबई :- राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. एसटी संपाबाबत तोडगा निघत नसल्याने जनशक्ती संघटना आक्रमक झाली आहे. अनिल परबांच्या घराबाहेर जनशक्ती संघटनेनं आंदोलन केलं. यावेळी जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एसटी संपावरुन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी अनिल परबांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जनशक्ती संघटनेचे ४ ते ५ कार्यकर्ते परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबईतील शासकिय घराबाहेर पोहचले होते. त्यांनी घोषणाबाजी करत घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, झटापट झाली. अखेर पोलिसांनी प्रकरण आटोक्यात आणलं आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. कार्यकर्त्यांनी सोबत काळी शाई आणली होती. परबांच्या घराबाहेर ही शाई फेकण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात घोषणाबाजी सुरु झाली आहे. तसेच परबांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा या पुर्वीही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यामुळे अनिल परब यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असला तरी हे कार्यकर्ते लपून छपून अनिल परबांच्या घराबाहेर पोहचले. कार्यकर्त्यांनी घरावर शाई फेक करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.




