पाचोरा भडगावकरांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद..
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद..
- दिलीप जय परदेशी
पाचोरा लाईव्ह | बांगलादेशात राहणार्या हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला तमाम नागरिकांनी साद घालत कडकडीत बंद पाळला. शुक्रवार दि.१६ ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजाकडून जळगाव जिल्हा बंदची हाक देण्यात आली. यामध्ये पाचोरा भडगाव शहरात सर्वच दुकानदार आणि विविध व्यावसायिक बंदला पाठिंबा देण्यासाठी उस्फूर्तपणे सहभागी झाले.

बांगलादेशमध्ये अराजकता निर्माण झाली असून तेथील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. तसेच त्यांच्याकडून हिंसाचार घडवून आणला जात आहे. या हिंसाचारात कोणतीही चूक नसताना तेथे राहत असलेल्या हिंदूंवर अमानुषपणे अत्याचार केला जात आहे. तसेच हिंदूंची घरे जाळली जात असून, निर्वासित केले जात आहे. तेथे राहत असलेल्या हिंदूंवर सुरू असलेला अत्याचार थांबवला जाऊन सरकारचे लक्ष वेधले जावे. यासाठी, सकल हिंदू समाजाकडून जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला पाचोरा भडगाव तालुक्यातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. या बंदला इस्कॉनचे पदाधिकारी व विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन, हिंदू जनजागृती समिती, समविचारी संघटना सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी, सर्व पक्षीय पाठींबा जाहीर केला होता.
- अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकाने बंद
शहरातील अत्यावश्यक सुविधेमध्ये येणारे मेडिकल दुकाने, शहरातील विविध रुग्णालये आणि रूग्णवाहिका सुविधा सुरळीतपणे सुरू होत्या. त्याचप्रमाणे शहरातील रिक्षा, शाळा, व हॉटेलांबरोबरच इतर सेवा पुरवणारे सर्वच दुकाने दुकानदारांकडून बंद ठेवण्यात आली होती. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुकानदारांनी दुकाने बंद केली.
सकल हिंदू समाज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाण मांडून भजन गायन व हनुमान चालीसा पठण केले. शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाचोरा बंदला दुकानदार व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. सकल हिंदू समाज संघटनांचे पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळपासून एकत्रित आले. त्यांनी मुख्य रस्त्यांवर फेरफटका मारून बंदचे आवाहन केले. कडकडीत बंद पाळण्यात आला. इस्कॉनचे स्थानिक पदाधिकारी व सदस्य, सकल हिंदू समाज संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हरे राम हरे कृष्णाचा जप करत भजन गायन तसेच सामूहिक हनुमान चालीसा पठण केले. पोलीस उपअधीक्षक धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. दंगा नियंत्रण पथकासह पोलीस अधिकारी व कर्मचारी शहरात गस्त घालत होते. बंद कडकडीत परंतु शांततेत पार पडला.




