CAG चे विनोद राय यांचा संजय निरुपमांना माफीनामा; 2G आणि कोळसा घोटाळा बदनामी मागितली विनाशर्त माफी
२०१४ मधे देशातील सत्तेत असलेल्या कॉंग्रेस युपीए सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यास कारणीभूत ठरलेल्या 2G आणि कोळसा घोटाळ्याप्रकरणी कॅगचे माजी प्रमुख विनोद राय यांनी बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांची विनाशर्त माफी मागितली आहे. विनोद राय यांनी त्यावेळी एका वृत्त वाहिनी आणि वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संजय निरुपम यांचं नाव या घोटाळ्यात घेतलं होतं. त्यावर संजय निरुपम यांनी दिल्लीतील एका न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता.
Finally former CAG Vinod Rai tendered an unconditional apology to me in a defamation case filed by me in MM Court, Patiyala house, New Delhi today.
He must apologize to the nation now for all his forged reports about 2G and Coal block allocations done by the UPA Govt.#VinodRai pic.twitter.com/OdxwZXonCq— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) October 28, 2021
संजय निरुपम यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन ही माहिती दिली असून विनोद राय यांनी त्यांच्या बनावट अहवालाप्रकरणी आता देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली आहे. संजय निरुपम यांनी म्हटलं आहे की, शेवटी कॅगचे माजी अध्यक्ष विनोद राय यांनी माझी विनाशर्त माफी मागितली आहे. त्यांच्या विरोधात मी नवी दिल्लीच्या पटियाळा येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात बदनामीचा दावा दाखल केला होता. विनोद राय यांनी त्यांच्या 2G आणि कोळसा घोटाळ्यासंबंधित बनावट अहवालाबद्दल आता देशाची माफी मागावी.
कॅगचे तत्कालीन अध्यक्ष विनोद राय यांनी सप्टेंबर 2014 मध्ये अर्णब गोस्वामींना टाईम्स नाऊ या वाहिनीसाठी एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी संजय निरुपम यांचा त्यांच्या 2G आणि कोळसा घोटाळ्यामध्ये समावेश असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला मुलाखत देतानाही त्यांचा पुनरोच्चार केला होता. ही मुलाखत इतरही वृत्तपत्रात छापून आली होती. त्यानंतर त्याच महिन्यात त्यांच्या ‘नॉट जस्ट अॅन अकाऊंटंट: द डायरी ऑफ द नेशन्स कन्सायन्स कीपर’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या दरम्यान देखील यावर भाष्य केलं होतं. विनोद राय यांनी संजय निरुपम यांच्या विरोधात केलेलं वक्तव्य हे चुकीचं असल्याचं कबुल केलं आहे. त्यामुळे निरुपम आणि त्यांच्या कुटुंबियांना झालेल्या मानसिक त्रासासाठी विनाशर्त माफी मागितली आहे.



