Majhi Ladki Bahin Yojana| दादा, आम्हाला पैसे नको, महागाई कमी करा..
महायुती सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली. मात्र दादा, आम्हाला पैसे नको महागाई कमी करा, अशी मागणी करत लाडक्या बहिणींनी आपल्या समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडल्या आहेत. हा मॅसेज व्हॉटसएप वर फिरत आहे.
या योजनेतंर्गत अल्प उत्पन्न गटातील २१ ते ६५ वयोगटाच्या महिलांना महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार असून सदर आर्थिक मदत न देता प्रचंड वाढलेल्या महागाईसह कमी खर्चात शिक्षण, रुग्णालयात होणारा वारेमाप खर्च आदी गंभीर प्रश्नांकडे लक्ष देऊन आम्हा बहिणींना दिलासा द्यावा अशा विनंतीचे पत्र सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.
पत्राची सुरुवात, आदरणीय एकनाथ (दादा) शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अशी करून पत्र लिहण्यास कारण की, सुरू केलेली ‘लाडकी बहीण माझी’ या योजने अंतर्गत आम्हाला महिना १५०० रुपये देण्यात येणार आहे. पण, दादा हे पैसे आम्हाला नको. त्या ऐवजी गॅसचे दर कमी करा, तसेच विजेचे दर कमी करा, चांगले रस्ते तयार करा, ट्रॅफिकची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा,
रुग्णालयांमध्ये कमी खर्चात सर्वांना एकसमान सुविधा निर्माण करा, पेट्रोल-डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा, शाळेची वारेमाप वाढलेली फी, सर्वांना स्वस्तात उत्तम शिक्षण मिळेल याची व्यवस्था करा, आदी मागण्यांबरोबरच यावेळी उच्च शिक्षण स्वस्त करा, महाविद्यालयांची वाढलेली फी कमी करा, जेणेकरून भाचे मंडळी कमी खर्चात डॉक्टर-इंजिनीयर होऊ शकतील.
ट्रेनला होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणा, भाचे आणि भाच्यांसाठी नोकरी रोजगार उपलब्ध करा, महाराष्ट्रातून परराज्यात जाणारे उद्योग धंदे थांबव जेणेकरून तुझ्या भावोजींना पैशांची चणचण लागणार नाही, त्यांचे आरोग्य सुखरूप राहील, प्रवासात जीव टांगणीला लागून प्रवास होणार नाही आणि त्यांच्या कमी पगारात, कमाईत सुद्धा तुझी बहीण सुखी राहील, अशी हक्काची मागणी लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पत्रामध्ये शेवटी दादा, आम्हाला १५०० रुपये खरंच नको देऊ. मात्र आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी आहेत, त्या जरूर द्याव्यात, अशी वास्तववादी समस्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली आहे.



