साक्री-मालेगाव बसचा अपघात; 40 जखमी
साक्री एसटी आगाराच्या साक्री-मालेगाव बसचा दुपारी तीनच्या सुमारास दातर्ती (ता. साक्री) गावानजिक अपघात होऊन यात बसमधील ४० प्रवासी जखमी झाले. यातील तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारांसाठी धुळे येथे रवाना करण्यात आले असून, अन्य ३७ रुग्णांवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील आगाराची साक्री-मालेगाव बस (एमएच ४०, एन ९०७५) दुपारी अडीचला आगारातून निघाल्यानंतर तीनच्या सुमारास दातर्ती गावाच्या अलीकडेच अपघातग्रस्त झाली.यातील प्रवाशांच्या सांगण्यानुसार दातर्ती गावाजवळ पांझरा नदीच्या पुलाच्या अलीकडेच वळणाजवळ बस जोरात उधळल्यानंतर मागील दोन्ही चाके निघाली आणि अपघात झाला. बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन प्रवाशांना बसमधून बाहेर काढले व रुग्णवाहिकेतून साक्री ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. यात बसमधील सर्व ४० प्रवासी जखमी झाले असून, त्यातील तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ धुळे येथे रवाना करण्यात आले.
अन्य जखमी रुग्णांवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी रुग्णांमध्ये धमनार, म्हसदी, ककानी, किरवाडे येथील प्रवाशांचा समावेश आहे. साक्री आगाराचे वाहतूक अधीक्षक कुणाल घडमोडे, वाहतूक निरीक्षक यशोवर्धन नगराळे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत अहिरे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत एसटी आगारातर्फे रुग्णांना तत्काळ मदत केली.



