महागाईचा भडका: एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ..
झूम मराठी वृत्त
पेट्रोल डिझेलच्या वाढणाऱ्या दरांमुळे सामान्य नागरिकांमध्ये केंद्र सरकार विरोधात चांगलाच रोष पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. वाढत्या दरांमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. अशातच आता मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी ओएमसीएसने एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.
सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी ओएमसीएसने प्रति सिलिंडर 104 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही दर वाढ घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात झाली नसून ती व्यावसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. गेल्या एक मार्चला व्यवसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 268.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा व्यवसायिक सिलिंडर 104 रुपयांनी महागला आहे. नव्या दरानुसार आता व्यवसायिक सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर 2,355 रुपयांवर पोहोचले आहेत.
पेट्रोल, डिझेलच्या दरात शेवटची दरवाढ सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. तेव्हापासून इंधनाचे दर स्थिर आहेत. 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटरमागे दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढ करण्यात आली आहे.



