धुळ्यात ५६ टक्के मतदान; सुभाष भामरे, शोभा बच्छावांचे भवितव्य मतयंत्रात बंद..
धुळे लोकसभा मतदारसंघात रणरणत्या उन्हात मतदारांनी घराबाहेर पडत मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघात सरासरी ५६ टक्के मतदान नोंदविण्यात आले.
धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण या सहा विधानसभा मतदारसंघांतील १ हजार ९६९ मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते. दुपारी काही ठिकाणी संथगतीने मतदान सुरू होते. मात्र, दुपारनंतर मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. दरम्यान, भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्ष व आरोप-प्रत्यारोपाला सोमवारी सायंकाळी पूर्णविराम मिळाला. मतदारांनी भावी खासदाराचे आपल्या मतदानातून भविष्य सीलबंद केल्यानंतर आता निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.



