जळगाव लोकसभा निवडणूकित स्मिता वाघ यांचे पारडे जड?
- दिलीप जय परदेशी
जळगाव लोकसभा भाजप-महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघांपेक्षाही भाजपचे संकट मोचन गिरीश महाजन यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असून ते पूर्ण ताकदीने प्रचार करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाचोऱ्यातून प्रचार सभा घेऊन प्रत्येक तालुक्यात प्रचाराचा रथ फिरवणार व भाजपचा विजय नक्कीच करणार असे मानले जात आहे.
या मतदारसंघात सातत्याने भाजपचे प्राबल्य राहिले आहे. पूर्वाश्रमीच्या एरंडोल व आताच्या जळगाव लोकसभा क्षेत्रात माजी केंद्रीय मंत्री एम.के. पाटील यांच्यानंतर २००७ मधील पोटनिवडणूक वगळता भाजपचेच खासदार सातत्याने निवडून आले आहेत. २००९, २०१४ व २०१९ मध्ये भाजपने मोठ्या फरकाने हा मतदारसंघ जिंकला.
आता प्रथमच भाजप विरूध्द शिवसेना (उद्धव ठाकरे) असा सामना रंगणार असून आजून ही निवडणूक रंगत आणणार असून महायुतीचे जळगाव लोकसभा उमेदवार स्मिता वाघ यांच्यामागे भारतीय जनता पक्षाचे संघटन, अभाविपचे केडर आणि विशेष म्हणजे संघाचे पाठबळ असून महायुती असल्यामुळे शिंदे गट शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, भाजपचे आमदार जामनेरचे आमदार गिरीश महाजन जळगाव आमदार राजुमामा भोळे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व राष्ट्वादीचे अंमळनेर आमदार अनिल पाटील अशी मोठी ताकदीचा जर योग्य वापर केला गेला तर स्मिता वाघ यांचा विजय निश्चित मानला जातो.
दुसरीकडे महा विकास आघाडीचे उमदेवार करण पवारांची भिस्त व्यक्तिगत मित्रपरिवार, नातेसंबंध, ठाकरे गट शिवसेना, काँग्रेस, शरद पवार गट यांचे पदाधिकारी, आणि खासदार उन्मेष पाटील यांची भाजपच्या मतदारांशी संवाद संपर्कावर किती मतदार आकर्षित करू शकतील त्यावर अवलंबून आहे.
भाजप पक्षातर्फे गेल्या दोन पंचवाषिकच्या मताधिक्यावर असलेल्या विजयाच्या गणितात भाजपने या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात दहा वर्षांत केलेल्या कार्याचे बळ वापरले. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचा चेहरा या वेळी पक्षातर्फे मतदारांच्या केंद्रस्थानी ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्याच बळावर या वेळी चार लाखांचे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा करण्यात येतो.
स्मिता वाघ याआधी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व नंतर विधान परिषद सदस्या म्हणून जिल्ह्याला परिचित आहेत, तर करण पवारांची राजकीय ओळख पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष या पलीकडे नाही. म्हणून भाजप-महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांचे पारडे जड मानले जात आहे.
महायुती व महाविकास आघाडीच्या नेते व पदाधिकारी हे कश्या पद्धतीने मतदारांकडे पोहचतात त्यावर मतदारसंघातील परिणामाचे भवितव्य अवलंबून आहे.



