Sharad Pawar : शरद पवार यांचा राजीनामा तीन दिवसांनंतर मागे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीने अध्यक्षपदाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात निवड समितीची बैठक सुरू आहे. यात दोन प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन प्रस्ताव मांडले आहेत. पहिला म्हणजे शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडण्यात आला. हा प्रस्ताव निवड समितीने मंजूर केला आहे. तर शरद पवार पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्हावेत, असा दुसरा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी मांडला आहे. त्यावरही समितीने मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे समितीचा निर्णय शरद पवार मान्य करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दोन दिवसांपूर्वी ‘लोक माझे सांगाती’ याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. शरद पवारांच्या घोषणेनंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. साहेब निर्णय मागे घ्या, कार्यकर्त्यांनी मागणी करत ठिय्या दिला होता. तेव्हापासूनच शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्या, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. शरद पवारांनी त्यावेळी चेंडू राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या कोर्टात टोलावला होता. त्यामुळे आजच्या बैठकीत समितीने राजीनामा फेटाळल्यानंतर शरद पवार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.



