उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात धनगर समाजातील आक्रमक चेहऱ्याला दिली मोठी जबाबदारी…
झूम मराठी वृत्त
शिवसेनेतील फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आता पक्षाच्या उभारणीसाठी मैदानात उतरले आहे. राष्ट्रवादीतून आलेल्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांच्याकडे उपनेतेपदाची जबाबदारी दिल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच पक्षात प्रवेश केलेल्या लक्ष्मण हाके यांच्या खांद्यावरही ठाकरे यांनी मोठी जबाबदारी सोपविली आहे. हाके यांच्याकडे प्रवक्तेपद देण्यात आले असून आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्याचा हाके यांचा प्रयत्न असणार आहे.

धनगर समाजातील युवकांमध्ये लक्ष्मण हाके प्रसिद्ध आहे. हाके यांना प्रवक्तेपदाच्या रुपाने संधी मिळाल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद माढा, बारामती, सांगली, परभणी यासह धनगर बहुसंख्य असणाऱ्या ११ लोकसभा मतदारसंघात वाढणार आहे.
लक्ष्मण हाके यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. उद्धव ठाकरे यांनी हाके यांना मोठी जबाबदारी दिल्यानंतर आगामी निवडणुकीत विद्यमान आमदार शहाजी पाटील यांच्यासाठी मोठे आव्हान उभे केले आहे.




