ब्रेकिंग

शिक्षणाचं बाजारीकरण!”…

शिक्षणाचं बाजारीकरण ही काही लोकांची आजच्या शिक्षणाला नांवं ठेवायची नेहमीची पद्धत आहे. “आमच्या काळी फार कमी लोकच शिकायचे, त्यामुळे कसा दर्जा टिकून होता” हा अक्षरशः जातीय प्रिविलेजचा छुपा गौरव आहे! बाजारीकरण म्हणजे ? गुरूच्या घरी पाणी भर, पाय चेप मग गुरू मनाला येईल तेव्हा शिकवेल अशी बकवास गुरुकुल पद्धत हवी आहे का ?

बाजारीकरण व्हायलाच हवं! कारण वाहतूक व्यवस्थेचं बाजारीकरण झालं की- माझ्या सोवळ्याला या “इतर” माणसाचा स्पर्श होईल, म्हणून याला माझ्या बाजूला बसू देऊ नका असं म्हणणाऱ्यांना गाडीतून हाकललं जातं! बाजारीकरण झालं नाही की पुरोहित पोसले जातात. शिक्षण ही एक सेवा आहे. हेल्थकेअर, वाहतूक, स्वच्छता या सेवांसारखी. तिला “पवित्र” मानून गुरू नांवाचे पुरोहित तयार करायचे आणि त्यांना डोक्यावर बसवून एका अन्यायी व्यवस्थेला बळ देत राहायचं हा नालायकपणा आहे.

गुरुकुल व्यवस्था म्हणजे काय माहिती आहे का ? गुरुकुल व्यवस्था म्हणजे एन्ट्रन्स कितीही चांगल्या मार्कांनी पास झालात तरी तुमच्या जातीमुळे तुमचा “कर्ण” किंवा “एकलव्य” केला जाऊ शकतो! “पूर्वी फक्त मोजकेच लोक शिकायचे म्हणून शिक्षणाला दर्जा होता” याचा सरळ अर्थ “बरेच लोक वंचित होते म्हणून आम्हाला सोय व्हायची” असा असतो.

बाजारीकरण झालं की सोवळी फाटतात! बाजारीकरण झालं की शिक्षण म्हणजे अमुक एक जातीचा प्रांत हा माज टिकत नाही! बाजारीकरण झालं की फीचे पैसे देणाऱ्या विद्यार्थ्याला जात/रंग/लिंग वगैरे न बघता शिक्षण मिळतं! बाजारीकरण झालं की गरज लागल्यास सरकारी मदत देऊन गरिबांना शिक्षण पुरवता येतं. बाजारीकरणच नसेल तर पुरोहितांची गुरुकुले मनमानी आणि शोषण करायला मोकळी असतात!

आज ज्याला शिकायचं आहे त्याला 50% डिस्काउंट कूपन वापरून घरी बसून व्हिडीओ लेक्चर्स उपलब्ध होतात, त्यात कोण ट्यूटर बरा आहे हे रिव्हुज वाचून ठरवता येतं आणि त्यात शिकवलेलं दर्जेदार वाटलं नाही तर बिनधास्तपणे कमी रेटिंग देऊन शिक्षणासाठी कोणाच्या तरी घरी गुलाम बनून राहा, त्याचे पाय चेपा, भांडी घासा वगैरे हलकट व्यवस्था बाजारीकरणाने मोडून टाकली आहे याचा आम्हाला आधुनिक भारताचे नागरिक म्हणून सार्थ अभिमान आहे.

आज पाहिजे शिक्षण घेण्यासाठी कोणा कर्णाला स्वतःची जात लपवावी लागत नाही, आज शिक्षणाची किंमत म्हणून कोणा एकलव्याला अंगठा गमवावा लागत नाही, आज शिक्षण घेण्यासाठी एखाद्याला सावित्रीला शेणाचे गोळे झेलावे लागत नाहीत यात लोकशाहीपुरस्कृत बाजारीकरणाचा वाटा आहे. या सोवळी झुगारून देणाऱ्या शिक्षणाच्या बाजारीकरणामुळेच सावित्रीबाई आणि ज्योतिरावांसारख्या सुधारकांनी ज्यासाठी घाम आणि रक्त सांडलं असं सर्वांसाठी मुक्त असलेलं शिक्षण आज बऱ्यापैकी शक्य झालंय. त्यामुळे काही लोकांना त्यांच्यासाठी रम्य असलेल्या भूतकाळातील गुरुकुलांची सोवळी प्यारी आहेत म्हणून ज्यां लोकांच्या आधीच्या पिढ्या ग्रहण सुटल्यावर दे दान म्हणत हिंडायच्या अशा समाजातील मुला-मुलींपर्यंत आधुनिक खगोलशास्त्र पोचवणारी शिक्षणाची गंगा बदनाम करण्यात अर्थ नाही.

लेखन – मकरंद देसाई

Disclaimer : वरील लेख एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. झूम मराठीच्या टीम अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व #झूम मराठी स्वीकारत नाही.

 


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे