ठाणे व पालघर जिल्हा शिक्षक पतपेढी निवडणूकीत राहुल परदेशी सर्वाधिक मतांनी विजयी
संचालक मंडळ निवडण्यासाठी झालेल्या निवडणूकीत भटक्या विमुक्त गटातून विजयी झालेले राहुल छबिलाल परदेशी हे सर्वाधिक मते मिळवून विजयी झाले आहेत
ठाणे (प्रतिनिधी) – ठाणे व पालघर जिल्हा शिक्षक पतपेढी निवडणूकीत भटक्या विमुक्त गटातील राहुल परदेशी हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत.
ठाणे व पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणूकीचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला. सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी २१ संचालकांचे संचालक मंडळ निवडण्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली. एप्रिल २०२० मध्ये मागील संचालक मंडळाची मुदत संपली होती मात्र कोरोना महामारीमुळे ही निवडणूक लांबत गेली. अखेर जून २०२२ ला ही निवडणूक संपन्न झाली. सन १९२९ मध्ये ही पतपेढी स्थापन झाली असून जवळपास साडेनऊ हजार प्राथमिक शिक्षक या पतपेढीचे सभासद आहेत. या पतपेढीची वार्षिक उलाढाल जवळपास ६०० कोटी रूपये असून ठाणे व पालघर जिल्हा हे या पतपेढीचे कार्यक्षेत्र आहे. ठाणे, कल्याण- डोंबिवली, मीराभाईंदर, नवी मुंबई, वसई विरार, भिवंडी, उल्हासनगर या महानगरपालिका तसेच अंबरनाथ व बदलापूर या नगरपालिका आणि ठाणे व पालघर या दोन जिल्हा परीषद यामध्ये कार्यरत शिक्षक या पतपेढीत सभासद आहेत.
सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षासाठी संचालक मंडळ निवडण्यासाठी झालेल्या निवडणूकीत भटक्या विमुक्त गटातून विजयी झालेले राहुल छबिलाल परदेशी हे सर्वाधिक मते मिळवून विजयी झाले आहेत. राहुल परदेशी हे प्राथमिक शिक्षक महासभा या शिक्षक संघटनेचे ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष असून शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ते झटत असतात. राहुल परदेशी यांना अभ्यासू शिक्षक प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते. सेवाशर्ती नियमावली व शासन निर्णयांचा त्यांचा अभ्यास असून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करतात. विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या राज्यस्तरीय समन्वय समितीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांनी ८७०० पैकी तब्बल ३३२३ मते मिळवून सर्व संचालकांमध्ये सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा बहुमान मिळविला आहे. त्यांच्या विजयाबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.




